मुंबई : देशभरात ट्रक, बस, अवजड वाहनचालकांचे ‘हिट अँड रन’ प्रकरणातील नव्या कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे. यात इंधन पुरवठा करणारे वाहने असून मुंबईत इंधनाची कमतरता जाणवू लागली आहे. मात्र, मुंबईकरांची रस्ते मार्गावरील जीवनवाहिनी असलेली बेस्टची सेवा सुरुच राहणार आहे. बेस्टच्या ताफ्यात डिझेलऐवजी सीएनजी वाहनांची संख्या अधिक असून, मुंबईकरांना बेस्टची साथ कायम राहणार आहे.
बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात एकूण २,९५४ बसगाड्या आहेत. यात सुमारे १,९६३ बसगाड्या या सीएनजी इंधनावर धावणाऱ्या आहेत. तर, डिझेल इंधनावर धावणाऱ्या ५२५ आणि विद्युत बसगाड्या ४६६ आहेत. त्यामुळे मुंबईत डिझेलचा पुरवठा कमी झाल्यास, सीएनजी आणि विद्युत २,४२९ बसगाड्या उपलब्ध आहेत. याद्वारे मुंबईकरांना सेवा देणे शक्य आहे.
हेही वाचा >>>कोकणातील कातळशिल्पांवर आधारित नाणे संकल्पनेला आंतरराष्ट्रीय पुरस्कार
इंधन बचत आणि पर्यावरण संवर्धानासाठी विद्युत बस खरेदी करण्यावर भर दिला जात आहे. तसेच मुंबईच्या रस्त्यावर विद्युत बस धावण्याला बेस्ट उपक्रमाकडून प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे विदयुत वाहनांची संख्या वाढत आहे. सध्या बेस्ट उपक्रमाकडे डिझेलचा साठा आहे. मात्र, डिझेलचा साठा संपल्यास ज्या मार्गावर डिझेल वाहने धावत आहेत, त्या मार्गावर सीएनजी किंवा विद्युत वाहने चालवण्यात येतील, असे बेस्ट उपक्रमाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.