मुंबई : मुंबईतील अनेक भागात अपुरा पाणीपुरवठा होत असल्यामुळे विरोधी पक्षातील नेते रस्त्यावर उतरल्यानंतर बुधवारी भाजपच्या माजी नगरसेवकांनी पाण्यासाठी पालिका कार्यालयावर मोर्चा नेला होता. माहीममधील भाजपच्या माजी नगरसेविका शीतल गंभीर आणि मुलुंडमधील माजी नगरसेवक प्रभाकर शिंद, प्रकाश गंगाधरे यांनी बुधवारी आपापल्या विभागामध्ये पाण्याच्या प्रश्नावरून पालिकेच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. विधानसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे पाण्याचा मुद्दा आता पेटण्याची चिन्हे आहेत.
मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे काठोकाठ भरली असली तरी मुंबईच्या अनेक भागात पुरेसे पाणी मिळत नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील अनेक भागांमध्ये अपुरा पाणीपुरवठा होत आहे. मात्र निवडणूक जवळ आल्यामुळे या मुद्द्यावरून आता मोर्चा, धरणे, आंदोलन सुरू झाले आहेत. गेल्याच आठवड्यात कॉंग्रेसचे दक्षिण मुंबईतील आमदार अमीन पटेल यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली होती. शिवडीचे आमदार अजय चौधरी यांनी मंगळवारी हंडा मोर्चा काढला होता. माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनीही पालिका आयुक्तांकडे पाणीपुरवठ्याबाबत लेखी तक्रार केली होती. विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघात पाणी टंचाई असल्याचा आरोप चौधरी यांनी केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बुधवारी भाजपच्या माजी नगरसेवकांनी पाणी प्रश्नासाठी पालिका कार्यालयात मोर्चा नेला होता.
हेही वाचा >>>बनावट बँक हमीच्या नावाखाली एक कोटींची फसवणूक; बँकेच्या कर्मचाऱ्यासह ओडिसातील पाच जणांविरुद्ध गुन्हा
मुलुंडमधील भाजपचे माजी नगरसेवक प्रकाश गंगाधरे आणि माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी मुलुंडमधील टी विभाग कार्यालयावर मोर्चा नेला होता. मुलुंडमधील इंदिरा नगर, डोंगरपट्टा कॉलनी, मुलुंड पूर्व येथील नानेपाडा परिसरात कमी पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी येत असून रात्रीच्या वेळी पाणीपुरवठा होतच नसल्याचे प्रकाश गंगाधरे यांनी सांगितले. मुलुंडमध्ये चोवीस तास पाणी पुरवठ्याचे आश्वासन देण्यात आले होते. आता पुरेसा पाणीपुरवठाही होत नसल्याची तक्रार गंगाधरे यांनी केली. सहाय्यक आयुक्त अजय पाटणे यांना यावेळी पाणीपुरवठ्याबाबतच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
माहीममधील भाजपच्या माजी नगरसेविका शीतल गंभीर यांनीही बुधवारी पालिकेच्या जी उत्तर विभाग कार्यालयावर मोर्चा नेला होता. माहीम, प्रभादेवी, धारावी या भागात कमी पाणीपुरवठा होत असून कपडाबाजार परिसर, नवजीवन सोसायटी येथे गढुळ पाणी येत असल्याची तक्रार गंभीर यांनी केली. स्वत:च्या घरीही अपुरा पाणीपुरवठा होत असल्याचे गंभीर यांचे म्हणणे आहे. अनेक सोसायट्यांना ट्रॅंकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत असून दिवसाला तीन ते चार ट्रॅंकर मागवावे लागतात. एकेका ट्रॅंकरसाठी पाच ते सहा हजार रुपये लागत असून पाणीटंचाईमागे ट्रॅंकरमाफियांचे मोठे आर्थिक गणित असल्याचा आरोप त्यांनी केला. गंभीर यांनी या मोर्चादरम्यान उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले. मुंबईचा पाणी प्रश्न येत्या विधानसभेच्या निवडणुकीत मोठा कळीचा मुद्दा बनण्याची शक्यता आहे.