लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: मुंबईच्या एका टोकाला असलेल्या गोराई, मनोरी भागातील रहिवासी आजही मूलभूत सुविधांपासून वंचित असून या भागात सोयी-सुविधा उपलब्ध करण्याची मागणी रहिवाशांकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र प्रशासन या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे अखेर गोराई, मनोरी परिसरातील रहिवासी बुधवारी मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयासमोर आंदोलन करण्यासाठी पोहोचले. मात्र पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रोखल्यामुळे रहिवासी संतप्त झाले आहेत.
मुंबईला लागूनच असलेल्या गोराई, मनोरी, उत्तन, कुलवेम या बेटांचा आजही विकस झालेला नाही. गेल्या काही वर्षांमध्ये महानगरपालिकेने या भागात विविध मोठे प्रकल्प आणले. या प्रकल्पांऐवजी महानगरपालिकेने पाणीपुरवठा यंत्रणा, शाळा, रुग्णालय अशा मूलभूत सोयी – सुविधा उपलब्ध कराव्या या मागणीसाठी येथील रहिवाशांच्या संघटनांनी बुधवारी आंदोलनाचा इशारा दिला होता.
आणखी वाचा-मद्यपी पित्याची मुलाने केली हत्या, हत्येनंतर मुलाने थेट गाठले पोलीस ठाणे
वॉचडॉग फाउंडेशन, गोराई-कुलवेम रहिवासी, धारावी बेट बचाओ समिती आदी विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते या आंदोलनात सहभाग झाले होते. मनोरी, कुलवेम, गोराई, उत्तन हा सर्व परिसर बेट असून ते धारावी बेट या नावाने ओळखले जाते. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून येथे सोयी-सुविधांचा अभाव आहे. राज्य सरकार आणि महानगरपालिका येथे मोठमोठे प्रकल्प राबवत आहे. रो रो जेट्टी, नि:क्षारीकरण प्रकल्प, गोराईला जोडणारा पूल, तलावांचे सुशोभीकरण आदींवर मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जात आहे. मात्र मूलभूत सुविधांसाठी निधी दिला जात नाही, अशी खंत येथील रहिवाशांनी व्यक्त केली. विविध मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याच्या मागणीसाठी बुधवारी सकाळी आंदोलनासाठी महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयाजवळ गेलेला रहिवाशांना पोलिसांनी रोखले. यामुळे रहिवासी संतप्त झाले आहेत.