लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : नव्याने पुनर्बांधणी करण्यात आलेले बोरिवलीमधील भगवती रुग्णालय, वांद्रे येथील के. बी. भाभा रुग्णालय, मुलुंडमधील म. तु. अगरवाल रुग्णालय, गोवंडीतील शताब्दी रुग्णालय आणि विक्रोळीतील क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयाच्या खासगीकरणाविरोधात ९ मे २०२५ पासून आंदोलन करण्याचा निर्णय म्युनिसिपल मजदूर युनियनने घेतला आहे. तसेच रुग्णालयांचे खाजगीकरण कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका घेत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.
म्युनिसिपल मजदूर युनियनच्या मुंबईतील कार्यालयामध्ये खासगीकरण विरोधी परिषदेचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुंबई महानगरपालिका रुग्णालयातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य महानगरपालिका, नगरपालिका कामगार कर्मचारी फेडरेशनचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बबनराव झिंजुर्डे यांनी केले. तर म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेचे कामकाज पार पाडले.
यावेळी मुबंई महानगरपालिकेने पुनर्बांधणी केलेली रुग्णालये सार्वजनिक खासगी भागिदारी तत्वावर चालविण्यास दिल्यास कामगार, कर्मचारी, परिचारिका, तंत्रज्ञ व डॉक्टर्स, तसेच गोरगरीब रुग्णांना होणारा त्रास याबाबत सविस्तर माहिती देताना मुंबईचे नागरिक आणि नोकरदार कर्मचारी अशा दुहेरी भूमिकेतून या खासगीकरणाचा विरोध करून रुग्णालये वाचविण्यासाठी लढले पाहिजे, असे आवाहन म्युनिसिपल मजदूर युनियनचे सहाय्यक सरचिटणीस प्रदीप नारकर यांनी केले. प्रशासनाकडून महापालिकेची तिजोरी खाली करण्याचे काम पद्धतशीरपणे सुरू आहे. यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना पुढील काही महिन्यानंतर वेळेवर वेतन न मिळण्याचे संकट येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही नारकर म्हणाले.
रुग्णालयाचे खाजगीकरण करू नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री, महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्रव्यवहार केला आहे, परंतु अद्याप बैठकीसाठी वेळ मिळालेली नाही, असे सांगत अशोक जाधव यांनी करदात्या जनतेच्या करातून पुनर्विकास केलेली रुग्णालये कोणाच्याही घशात घालायला देणार नाही. अशी भूमिका घेत तरली खासगीकरणाविरोधात ठिय्या आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनाला ९ मे रोजी बोरिवलीतील भगवती रुग्णालयापासून करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. त्यानंतर के. बी. भाभा रुग्णालय, म. तु. अगरवाल रुग्णालय, शताब्दी रुग्णालय, क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालय या रुग्णालयांचे खाजगीकरण कायमस्वरूपी रद्द करेपर्यंत लढण्याचे आवाहन त्यांनी केले.
६० हजारांहून अधिक पदे रिक्त
शासनाच्या धोरणाप्रमाणे सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांची रिक्त पदेही भरली जात नाहीत, आस्थापनेवर सर्व संवर्गातील १ लाख ४५ हजार ५७३ पदांपैकी फक्त ८५ हजार कामगार, कर्मचारी, अधिकारी काम करीत आहेत. सुमारे ६० हजारांहून अधिक पदे रिक्त आहेत. रिक्त पदे भरण्यास प्रशासन टाळाटाळ करत असल्याचे प्रदीप नारकर यांनी सांगितले. यावेळी युनियनचे सरचिटणीस वामन कविस्कर यांनी प्रास्ताविक केले. कार्याध्यक्ष यशवंतराव देसाई, उपाध्यक्ष, कृती समितीचे अध्यक्ष मुकेश करोतिया, नर्सिंग अँड पॅरामेडिकल स्टाफ युनियनच्या सरचिटणीस त्रिशीला कांबळे, सहाय्यक सरचिटणीस रंजना आठवले यांनीही मार्गदर्शन केले.
दुर्लक्ष केल्यास जूनमध्ये मोठे आंदोलन
तरीही सरकार आणि महापालिका प्रशासनाला जाग आली नाही तर जूनमध्ये आझाद मैदानावर सर्व महापालिका रुग्णालयांसोबत अन्य खात्यांचे मोठे आंदोलन करण्याचा ठराव एकमुखाने करण्यात आला, या खासगीकरण विरोधी परिषदेला सर्व रुग्णालयातील सुमारे २०० पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.