सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूपूर्वी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी रिया चक्रवर्तीला अनेक फोन केल्याचा आरोप शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी बुधवारी केला. शेवाळे यांच्या वक्तव्याविरोधात चेंबूरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली.
हेही वाचा >>>मुंबई: गिरणी कामगार घर सोडत-२०२०; पात्र गिरणी कामगार, वारसांना तात्पुरते ऑनलाईन देकार पत्र
अभिनेता सुशांत सिंग याच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्तीच्या मोबाइलवर ४० पेक्षा अधिक फोन आले होते. हा नंबर au या नावाने तिच्या मोबाइलमध्ये होता. Au म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असा त्याचा अर्थ होता, अशी माहिती मला बिहार पोलिसांकडून मिळाल्याचा गौप्यस्फोट दक्षिण मध्य मुंबईचे शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी बुधवारी केला. त्यामुळे याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी राहुल शेवाळे यांनी केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी गुरुवारी शेवाळे यांच्या वक्तव्याचा निषेध केला. चेंबूर नाका येथील शिवेसना मध्यवर्ती कार्यालयाबाहेर एकत्र जमून शेवाळे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.