मुंबई : रस्ते काँक्रिटीकरणाच्या दर्जाबाबत, कामाच्या पद्धतीबाबत प्रश्न उपस्थित करून वॉचडॉग फाउंडेशन आणि मरोळ भागातील रहिवाशांनी पालिकेच्या के पूर्व कार्यालयासमोर निदर्शने केली. कंत्राटदाराला दिलेले कंत्राट रद्द करावे आणि प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी सातत्याने देखरेख न ठेवणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
महानगरपालिकेने के पूर्व विभागातील मरोळ येथील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम एआयसी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांना दिले असून संबंधित कंत्राटदार अपात्र आणि अक्षम आहे, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. पावसाळ्यात पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होण्यासाठी रस्त्यांची विशिष्ट उंची असणे गरजेचे असते. मात्र, संबंधित कंत्राटदाराने पावसाचे पाणी वाहून नेणारा नाला रस्त्याच्या उंचीपेक्षा सुमारे २५ सेंटीमीटर उंच बांधला आहे. हा नाला आजूबाजूच्या सोसायट्या, दुकानांच्या जमिनीच्या पातळीशी समांतर आल्यामुळे पावसाळ्यात परिसरात पाणी पोचण्याचा धोका निर्माण होणार असल्याचा दावा फाउंडेशनने केला आहे. कंत्राटदाराने रस्ते काँक्रिटीकरण अयोग्य पद्धतीने केल्यामुळे पूर परिस्थिती उद्भवू शकते. दरम्यान, कंत्राटदाराच्या हलगर्जीपणाकडे महापालिकेनेही दुर्लक्ष केल्याचे फाउंडेशनचे म्हणणे आहे. याबाबत पालिकेच्या के पूर्व विभाग कार्यालयासमोर सोमवारी निदर्शने करण्यात आली. यात स्थानिकांसह काही दुकानदारांचाही समावेश होता.
भविष्यात निर्माण होणारी पूरस्थिती टाळण्यासाठी रस्ता आणि नाल्याच्या उंचीत अंतर ठेवावे, कामातील हलगर्जीप्रकरणी कंत्राटदारावर कारवाई करावी, कंपनीला दिलेले कंत्राट रद्द करावे, आदी मागण्या स्थानिकांनी केल्या. प्रत्यक्ष कार्यस्थळी देखरेख ठेवण्यासाठी उपस्थित असणे अनिवार्य असतानाही पालिकेचे अधिकारी तेथे येत नसल्याने त्यांना निलंबित करावे, अशीही मागणी यावेळी त्यांनी केली.
दरम्यान, ही समस्या निर्माण झालेला भाग गावठाण असून पावसाच्या निचऱ्याचा निचरा करण्यासाठी नाला बांधण्याची मुळातच गरज नव्हती. तेथे पूर्वीपासूनच सांडपाणी वाहून नेणारी व्यवस्था आहे. याशिवाय, रस्ता खोदकाम कंत्राटदाराकडून अनेक वेळा जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार घडले आहेत. मात्र, त्यांच्यावर कारवाई झाली नसल्याचे वॉचडॉग फाउंडेशनकडून सांगण्यात आले आहे.