मुंबई : मुंबई महानगरपालिकेने पुर्नविकास केलेल्या वांद्रे येथील के. बी. भाभा रुग्णालयाची विस्तारित इमारत, बोरिवलीतील भगवती रुग्णालय आणि सावित्रीबाई फुले रुग्णालय, मुलुंडमधील एम. टी. अग्रवाल रुग्णालय, विक्रोळीतील क्रांतीज्योती महात्मा फुले रुग्णालय यांचा पुनर्विकास करून ती अद्ययावत करण्यात येत आहेत. मात्र रुग्णालये अद्ययावत करताना त्यांचे खाजगीकरण करण्यात येत असल्याने म्युनिसिपल मजदूर युनियनने गुरुवारी मुंबई महानगरपालिकेच्या शीव रुग्णालय, नायर दंत महाविद्यालय आणि क्षयरोग रुग्णालय येथे थाळीनाद आंदोलन करून मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या निर्णयाचा निषेध केला.

ठाणे, पालघर, कल्याण, डोबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, पनवेल, पेण, वसई, नालासोपारा तसेच महाराष्ट्रातील विविध विभागातून गरीब रुग्ण मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येतात. या रुग्णांना चांगल्या प्रकारची वैद्यकीय सेवा निशुल्क अथवा माफक दरात दिली जाते. महानगरपालिकेच्या वांद्रे येथील के. बी. भाभा रुग्णालय, बोरिवलीतील भगवती रुग्णालय आणि सावित्रीबाई फुले रुग्णालय, मुलुंडमधील एम. टी. अग्रवाल रुग्णालय, विक्रोळीतील क्रांतीज्योती महात्मा फुले रुग्णालयातील वैद्यकीय सेवा अपुरी पडत असल्यामुळे किंवा काही रुग्णालये मोडकळीस आल्यामुळे त्यांचा पुनर्विकास करण्यात येत आहे. मात्र हा पुनर्विकास करताना रुग्णालयांचे खासगीकरण करण्याचा घाट मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घातला आहे.

शिवडी येथील क्षयरोग रुग्णालय, सांताक्रुझमधील व्ही. एन. देसाई रुग्णालयामधील स्वयंपाकघर खाजगी ठेकेदाराला दिले आहे. त्याचप्रमाणे काही रुग्णालयांतील रक्तपेढी, अतिदक्षता विभाग खाजगी संस्थांना चालविण्यासाठी दिले आहेत. या रुग्णालयांप्रमाणे अन्य रुग्णालयांचे खाजगीकरण झाल्यास नागरिकांना अद्ययावत, निःशुल्क अथवा माफक दरात मिळणाऱ्या वैद्यकीय सेवांपासून वंचित रहावे लागणार आहे. त्यांना खाजगी रुग्णालयांप्रमाणेच महागडे उपचार घेण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. तसेच रुग्णालयांमध्ये अनेक वर्षांपासून रुग्ण सेवा देत असलेल्या कर्मचाऱ्यांना इतरत्र पाठविण्यात येत आहे किंवा त्यांची पदे खंडित करण्यात येत आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात येण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेचा हा निर्णय कामगार विरोधी असल्यामुळे कर्मचाऱ्यांसह नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून, हा निर्णय मागे न घेतल्यास त्याचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.

रुग्णालयांच्या खासगीकरणाचा विरोध करण्यासाठी म्युनिसिपल मजदूर युनियनतर्फे मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये निदर्शने करण्यात येणार आहे. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेच्या शीव रुग्णालय, नायर दंत महाविद्यालय आणि क्षयरोग रुग्णालय येथे म्युनिसिपल मजदूर युनियनतर्फे गुरुवारी थाळीनाद करत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच खासगीकरणाचा निर्णय मागे घेण्यासंदर्भात प्रशासनाला निवेदन दिल्याचे म्युनिसिपल मजदूर युनियनचे सहाय्यक सरचिटणीस प्रदीप नारकर यांनी सांगितले.