मुंबई : कर्करोग रुग्णांसाठी लाभदायक ठरणाऱ्या रेडिएशन उपचार पद्धतीचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. मात्र आता कर्करोग रुग्णांसाठी प्रोटॉन थेरपी महत्त्वपूर्ण ठरत आहे. आतापर्यंत केवळ वयस्कर व्यक्तींसाठी वापरण्यात येणाऱ्या या थेरपीचा आता लहान मुलांसाठीही वापर करण्याचा निर्णय टाटा रुग्णालयाने घेतला आहे. जानेवारीपासून लहान मुलांवर प्रोटॉन थेरपीच्या माध्यमातून उपचार करण्यात येणार आहेत. सुरुवातीला डोके आणि मानेच्या कर्करोगाने ग्रस्त मुलांवर या पद्धतीने उपचार करण्यात येणार आहेत. त्यानंतर भविष्यात टप्याटप्याने अन्य कर्करोगाने ग्रस्त लहान मुलांवर या पद्धतीने उपचार करण्यात येणार आहेत. दरम्यान, प्रोटॉन उपचार पद्धतीचा दरवर्षी २५०० ते ३००० मुलांना लाभ होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> शीव येथे दोन जलवाहिन्या फुटल्या, वडाळा व आसपासच्या भागातील पाणीपुरवठा खंडित

खारघर येथील टाटा रुग्णालयाच्या ॲक्ट्रक केंद्रामध्ये १५ ऑगस्ट रोजी प्रोटॉन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या केंद्रामध्ये हाडांच्या कर्करोग रुग्णांवर प्रोटॉन उपचार पद्धतीच्या माध्यमातून उपचार केले जातात. प्रोटॉन उपचार पद्धतीने आतापर्यंत २६ वयस्क रुग्णांवर उपचार करण्यात आले असून, त्यांना या सुविधेचा चांगला लाभ झाला आहे. सामान्य रेडिएशनमध्ये दिसणारे दुष्परिणाम आजपर्यंत या पद्धतीमध्ये एकाही रुग्णांमध्ये दिसले नाहीत. प्रोटॉन थेरपीमध्ये चांगल्या पेशी नष्ट झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे कर्करोगग्रस्त लहान मुलांसाठी या पद्धतीचा वापर करण्याची आम्ही तयारी सुरू केली आहे. हे तंत्र समजून घेण्यासाठी आणि परिणाम जाणून घेण्यासाठी आम्ही प्रथम प्रौढांवर प्रोटॉन थेरपी सुरू केली होती. लहान मुलांवर प्रोटॉन पद्धतीने उपचार करण्याच्या प्रक्रियेला जानेवारीमध्ये सुरूवात करण्यात येणार आहे. सुरुवातील ज्या लहान मुलांना डोके व मान, ब्रेन ट्यूमुर आणि पोटाचा कर्करोग असलेल्या मुलांवर या पद्धतीने उपचार करण्यात येणार असल्याची माहिती टाटा रुग्णालयाचे उपसंचालक, प्रोटॉन सेंटरचे प्रमुख डॉ. सिद्धार्थ लष्कर यांनी दिली.

सुविधा वाढविण्यावर भर

खारघर येथील ॲक्ट्रकमध्ये सध्या एका कक्षामध्ये प्रोटॉन पद्धतीने उपचार करण्यात येत आहे. मात्र टप्याटप्प्याने तीन कक्ष उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे अधिकाधिक रुग्णांना या पद्धतीने उपचार घेता येतील. साधारण एका रुग्णाला किमान ७ ते ८ आठवडे उपचारासाठी बोलविण्यात येते. तर काही रुग्णांसाठी हा कालावधी पाच ते सहा आठवडे असण्याची शक्यता आहे.

यासाठी प्रोटॉन प्रभावी आहे स्तन, अन्ननलिका, जठरासंबंधी, डोके आणि मान, यकृत, फुफ्फुस, स्वादुपिंड, मूत्राशय आणि मणक्याच्या कर्करोगामध्ये प्रोटॉन पद्धत प्रभावी ठरत आहे. परंतु सर्वच रुग्णांवर या पद्धतीने उपचार केले जात नाहीत. या पद्धतीने कोणत्या रुग्णांवर उपचार करायचे याबाबतचा निर्णय रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक घेते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Proton therapy for cancer in children proton therapy for treating childhood cancer mumbai print news zws