मुंबई : टाटा रुग्णालयात रुग्णांना अधिक चांगले व उत्तम उपचार मिळावेत यासाठी गतवर्षी सुरू करण्यात आलेली प्रोटॉन उपचार पद्धती रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. मागील १३ महिन्यांमध्ये टाटा रुग्णालयाच्या खारघर येथील ॲक्ट्रॅक येथे १४७ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले. यापैकी ६२ टक्के रुग्ण सर्वसामान्य असून, २४ टक्के रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले.
टाटा रुग्णालयाच्या खारघर येथील ॲक्ट्रॅक येथे गतवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रोटॉन उपचार केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन झाल्यापासून आतापर्यंत कर्करोग झालेल्या १४७ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. यामध्ये १८ टक्के लहान मुलांचा समावेश आहे. या उपचार पद्धतीचे दुष्परिणाम फारच कमी असल्याने हाडांच्या कर्करोगासाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. हाडाच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या ३२ टक्के रुग्णांवर प्रोटॉन पद्धतीने उपचार करण्यात आले आहेत. तसेच २९ टक्के स्तन कर्करोग, १४ टक्के डोके आणि मानेचा कर्करोग असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात आले आहे. त्याचबरोबर प्रोस्थेट कर्करोग, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, पुरुष ग्रंथी कर्करोग आणि जठरासंदर्भातील कर्करोगांवरही उपचार करण्यात आल्याची माहिती प्रोटॉन उपचार केंद्राचे प्रमुख डॉ. सिद्धार्थ लस्कर यांनी दिली. प्रोटॉन उपचार पद्धतीचा जास्तीत जास्त फायदा रुग्णांना व्हावा आणि कमीत कमी दुष्परिणाम व्हावे यासाठी केंद्रात उपचार घेतलेल्या सर्व रुग्णांची तज्ज्ञांद्वारे बारकाईने तपासणी करण्यात येते.
उपचारासाठी पाच लाख रुपये खर्च
परदेशात प्रोटॉन उपचार पद्धतीसाठी एक ते दीड कोटी रुपये खर्च येतो. मात्र टाटा रुग्णालयामध्ये सर्वसामान्यांवर पाच लाख रुपये, खासगी रुग्णांवर १५ लाख रुपये आणि परदेशी रुग्णांवर २५ लाखांमध्ये उपचार करण्यात येतात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांवर या पद्धतीने मोफत उपचार व्हावे यासाठी रुग्णालय प्रशासन सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत निधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करीत आहे, असे डॉ. लस्कर यांनी सांगितले.
दीड वर्षाच्या मुलीवर यशस्वी उपचार
कोल्हापूर येथील एका दीड वर्षाच्या मुलीला न्यूरो ब्लास्टोमा कर्करोग झाला होता. टाटा रुग्णालयात उपचार केल्यानंतर ती बरी झाली होती. मात्र १६ वर्षांनंतर तिला पुन्हा कर्करोग झाला. कर्करोगाची गाठी ही डोळ्यांजवळ असल्याने ती काढणे डॉक्टरांसाठी एक आव्हान हाेते. मात्र प्रोटॉन उपचार पद्धतीने कर्करोगाची गाठ सहज नष्ट करणे शक्य झाल्याची माहिती डॉ. लस्कर यांनी दिली.