पाचगणी येथील टेबललॅण्डवर घोडागाडी सफारी ही पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक ठरत असेल, तर घोडागाडी मालक आणि तेथील स्टॉलधारकांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्याच्या हेतूने त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी नगरपरिषदेला दिले. न्यायमूर्ती विद्यासागर कानडे आणि न्यायमूर्ती अमजद सय्यद यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. त्या वेळेस न्यायालयाने हे निर्देश दिले. या पूर्वी न्यायालयाने पाचगणी नगरपरिषद आणि पर्यावरण तज्ज्ञ यांना टेबललॅण्डवर घोडागाडी आणि घोडय़ांच्या सफारीला परवानगी दिल्यास काय पर्यावरणीय परिणाम होऊ शकतात याची तसेच घोडेमालकांना व टेलबलॅण्डवरील स्टॉलधारकांना पर्यायी जागा उपलब्ध होत असेल, तर त्याबाबत माहिती देण्याचे आदेश दिले होते. शुक्रवारच्या सुनावणीत यावर अद्याप तोडगा निघू शकलेला नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे पाचगणी टेबललॅण्डवरील दुर्मीळ वनस्पतींचे संरक्षण आणि घोडागाडी सफारी सुरू करून घोडागाडी चालकांच्या पोटापाण्याच्या प्रश्न असा तिढा सोडविण्यासाठी याचिकादार, नगरपरिषद, पर्यावरणतज्ज्ञ सगळ्यांनीच एकत्र येऊन परस्पर सामंजस्याने उपाय शोधावा, असे आदेश पुन्हा दिले. पाचगणी टेबलॅण्डवर ब्रिटिशांच्या काळापासून दुर्मीळ वनस्पती असून घोडागाडीमुळे त्या नष्ट होण्याची भीती व्यक्त करीत ‘बॉम्बे एन्व्हायर्मेट’ या संस्थेने उच्च न्यायालयात याचिका केली आहे.

Story img Loader