मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये अनेक वेळा डॉक्टर आणि रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक यांच्यामध्ये वाद होतात. अनेक वेळा या वादाचे रूपांतर हाणामारीत होते. यामुळे डॉक्टर आणि रुग्णालयाची प्रतिष्ठा पणाला लागते. ही बाब लक्षात घेऊन रुग्णांसोबत कसे वागायचे, त्यांच्यासोबत कसा संवाद साधायचा याचे धडे डॉक्टरांना देण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. याची सुरुवात महानगरपालिकेच्या प्रसुतिगृहापासून करण्यात येणार आहे.
एखादा रुग्ण जेव्हा अत्यवस्थेत रुग्णालयात येतो, त्यावेळी त्याचे नातेवाईक प्रचंड तणावाखाली असतात. अशावेळी डॉक्टरांनी व्यवस्थित माहिती दिली नाही, तर रुग्णांचे नातेवाईकांचा त्यांच्याबरोबर वाद होतो. प्रसंगी वादाचे पर्यवसन हाणामारीत होते. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी आता मुंबई महानगरपालिकेने एक पाऊल पुढे टाकले आहे. मुंबई महानगरपालकेच्या प्रसुतिगृहामध्ये येणाऱ्या रुग्णांसोबत डॉक्टर, अधिकारी आणि कर्मचारी यांनी अत्यंत नम्रपणे आणि संयमाने वागावे, त्यांच्या वागण्यातून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांचे समाधान व्हायला हवे. तसेच उभयतांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण व्हायला हवी.
हेही वाचा >>> जे जे रुग्णालयातील डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे अत्यवस्थ रुग्णाचा पाय वाचला
यासाठी डॉक्टर, अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘सॉफ्ट स्किल्स’चे प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे प्रशिक्षण टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (टीआईएसएस) या संस्थेमार्फत देण्यात येत आहे. नुकतेच या प्रशिक्षणाचे पहिले सत्र पूर्ण झाले. यामध्ये प्रसुतिगृहामधील ४२ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. डॉक्टर, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी जुलै आणि ऑगस्टमध्ये ३० प्रसूतिगृहांमध्ये ५८ प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांनी दिली.