अडचणीत असलेल्यांना आणि निधन झालेल्यांच्या वारसदारांना कर्मचारी भविष्यनिर्वाहनिधी आणि निवृत्तीवेतनाची रक्कम देण्यासाठी या कार्यालयाने सुरू केलेल्या अभिनव योजनेची बातमी ‘लोकसत्ता’ मध्ये गुरूवारी प्रसिध्द होताच सकाळी साडेसहा वाजल्यापासून संबंधित अधिकाऱ्यांचे मोबाईल आणि दिवसभर लँडलाईन दूरध्वनी खणखणत होते. अभिनंदन, शुभेच्छांबरोबरच तक्रारींचा पाऊसच या कार्यालयावर पडला. ही अभिनव योजना देशपातळीवरही सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
वृत्तपत्रातील निधनाच्या बातम्या, दशक्रिया किंवा श्रद्धांजलीच्या जाहिराती पाहून कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी कार्यालयातील संबंधित कर्मचारी पुढाकार घेऊन संबंधितांच्या घरी जात आहेत. तातडीने त्यांची रक्कम दिली जात आहे. मुंबई विभागीय कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी आयुक्त के.एल. गोयल यांच्या पुढाकाराने मानवतावादी भूमिकेतून ही योजना सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला किंवा खातेधारकाला आणि त्याच्या वारसदाराला त्याची रक्कम व निवृत्तीवेतन तातडीने मिळाले पाहिजे, या हेतूने विभागाने पावले टाकली आहेत. देशाचे मुख्य कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आयुक्त के.के. जालान शुक्रवारी मुंबईत येत आहेत. त्यांच्या बैठकीत या योजनेबाबत माहिती दिली जाणार असून देशपातळीवरही ही योजना सुरू करण्याचे प्रयत्न होण्याची शक्यता आहे.
या योजनेची माहिती प्रसिध्द होताच दिवसभर तक्रारींचाही पाऊस पडला आहे. शासकीय, म्हाडापासून अनेक विभागांच्या भविष्यनिर्वाह निधीच्या तक्रारीही या कार्यालयाकडे आल्या आहेत. त्यांच्याशी वास्तविक कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीचा संबंध नाही. मात्र त्या तक्रारीही मार्गी लावण्यासाठी संबंधित कार्यालयांकडे पाठविल्या जातील आणि अडचणी दूर केल्या जातील, असे विशेष अधिकारी अविनाश ठाकूर यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा