बलात्कारासारख्या घृणास्पद प्रकारांना आणि महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारी मनोवृत्तीला आळा घालण्यासाठीच दोनदा बलात्कार करणाऱ्यांना फाशीची नवी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे गुन्हेगारी मनोवृत्तीला जरब बसविण्यासाठी असलेल्या या तरतुदीनुसार शक्ती मिल खटल्यातील दोषींवर नवा आरोप ठेवू द्यावा, अशी मागणी सरकार पक्षाने सत्र न्यायालयास सोमवारी केली.

आरोपींना दोन्ही खटल्यात बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये दोषी ठरविण्यात आले आहे आणि या दोन्ही खटल्यांमधून त्यांची गुन्हेगारी मनोवृत्ती स्पष्ट होत असल्याचा युक्तिवाद निकम यांनी केला. तर कायद्यातील नव्या सुधारणेचा आधार घेत ही मागणी करणे चुकीचे असल्याचा दावा बचाव पक्षातर्फे करण्यात आला. या तरतुदीनुसार आरोपी यापूर्वी अन्य खटल्यांमध्ये दोषी ठरणे आवश्यक आहे. परंतु ज्या टेलिफोन ऑपरेटर बलात्कार खटल्याचा आधार घेत सरकारी पक्ष आरोपींना गुन्हेगारी मनोवृत्तीचे ठरवून त्यांना कठोरातील कठोर शिक्षा ठोठावण्याच्या दृष्टीने नवा आरोप ठेवण्याची मागणी करीत आहेत ते अयोग्य असल्याचा दावाही आरोपींच्या वतीने करण्यात आला. हे दोन्ही खटले एकाच वेळी चालविण्यात आले आणि दोन्ही खटल्यांचा निकाल १० ते १५ मिनिटांच्या अंतराने देण्यात आला. अद्याप आधीच्या खटल्याच्या निकालाची प्रतही मिळाली नाही. त्यामुळे आरोपींवर नवा आरोप ठेवला जाऊ शकत नाही, असे बचाव पक्षाकडून सांगण्यात आले. परंतु न्यायालयाने त्यांचे म्हणणे फेटाळून लावले.
बलात्कारप्रकरणी दोनदा दोषी ठरलेल्या आरोपींना ‘गुन्हेगार मनोवृत्तीचे’ म्हणून कमीत कमी आजन्म कारावास, तर कठोरातील कठोर शिक्षा म्हणून फाशीची शिक्षा सुनावण्याची तरतूद करण्यात आली आहे. दोन्ही खटल्यांतील विजय जाधव, कासीम बंगाली आणि सलीम अन्सारी या तीन आरोपींना न्यायालयाने बलात्काराच्या गुन्ह्य़ांसाठी दोषी धरले असल्याने वृत्तछायाचित्रकार तरूणीवरील बलात्कारप्रकरणी शिक्षा सुनावण्याआधी सुधारित कायद्यानुसार आरोपींवर नवा आरोप ठेवण्याची मागणी निकम यांनी केली होती.