दिल्लीतील सामुहिक बलात्काराचे प्रतिबिंब मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेत मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पातही उमटले असून मुलींना स्वयंसरक्षणाचे धडे देण्यासाठी विद्यापीठाने अर्थसंकल्पात प्रथमच पाच लाख रुपयांची तरतूद केली आहे.
या योजनेबरोबरच कलिना संकुलातील ‘जवाहरलाल नेहरू ग्रंथालया’च्या दुरूस्तीकरिता अर्थसंकल्पात १ कोटी रूपये राखून ठेवण्यात आले आहेत. याशिवाय चीनी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी कन्फुशस सेंटरकरिता विद्यापीठातर्फे पाच लाखांची तरतूद करण्यात येणार आहे. या सेंटरकरिता चीनकडून १ लाख ५० हजार डॉलर्सची भरघोस मदत करण्यात येणार आहे.
एकूण ३९४ कोटी रूपयांच्या तरतुदी असलेला अर्थसंकल्प अधिसभेत मांडण्यात आला. यात आंतरराष्ट्रीय शिबिरे व परिसंवादांसाठी २५ लाख रुपये, नावीन्यपूर्ण उपक्रम आणि बुद्धीसंपदा हक्क मिळविणाऱ्यांना १० लाख रुपये, संशोधनाचे काम करणाऱ्या विद्यापीठातील शिक्षकांना २ लाखांचे पुरस्कार आदी शैक्षणिक कार्यक्रमांसाठी तरतुदी विद्यापीठाने अधिसभेत मांडलेल्या २०१३-१४ च्या अर्थसंकल्पात केल्या आहेत. या व्यतिरिक्त कलिना संकुलात संरक्षण इमारत, मुलींसाठी वसतीगृह आदी बांधकामविषयक कामासाठी काही लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
याचबरोबर उत्कृष्ट विद्यार्थी आणि विद्यार्थिनीला १ लाखाचे पारितोषिक, आईज सिरीज ५ लाख, सेंटर फॉर एक्सलन्स इन सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी ५लाख, संपर्क संस्थेकरिता ५ लाख, विद्यापीठ युवा धोरणाकरिता २ लाख, महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरिता २ लाखांचे पुरस्कार आदी उपक्रमांसाठी बाजूला काढण्यात येणार आहेत.
मराठीच्या मुद्दय़ावरून गदारोळ
मराठी भाषा दिनाची दखल न घेणाऱ्या विद्यापीठ प्रशासनावर अधिसभेतील युवा सेनेचे सदस्य गुरुवारी तुटून पडले. एकेकाळी मराठी भाषा दिन विद्यापीठात दणक्यात साजरा होत असे. पण, यंदा किरकोळ कार्यक्रम आयोजित करून विद्यापीठाने आपली मराठी भाषेविषयीची अनास्था दाखवून दिली होती. याच दिवशी विद्वत सभेची बैठक आयोजिण्यात आल्याने विद्यापीठाचे पदाधिकारी या कार्यक्रमाला फिरकलेही नाहीत. विद्यापीठातील शिक्षक आणि अधिसभेचे सदस्य यांना तर या कार्यक्रमाची निमंत्रणेही नव्हती. मराठी भाषा दिनानिमित्त अनास्था दाखविल्याबद्दल कुलगुरूंनी माफी मागावी, अशी मागणी युवा सेनेचे महादेव जगताप यांनी केली. मराठी विभागातील अपुरे कर्मचारी, मराठी साहित्य इंग्रजीत भाषांतरित करण्याची रखडलेली योजना आदी प्रश्नांचा पाढाही यावेळी सदस्यांनी वाचला. मराठी भाषेकरिता अध्यासन सुरू करण्याची सूचना प्रा. मोहसिना मुकादम यांनी यावेळी केली. या चर्चेला उत्तर देताना पुढील वर्षीपासून मराठी भाषा दिनानिमित्त जोरदार कार्यक्रम करू, असे आश्वासन कुलसचिव कुमार खैरे यांनी दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा