मुंबई: धारावीकरांना सुरुवातीपासूनच ३५० चौरस फुटाचे घर मिळणार होते आणि तशी तरतुद राज्य शासनाने २०१५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. अशा वेळी धारावीचा पुनर्विकास प्रकल्प राबविणाऱ्या अदानी समुहाने धारावीकरांना १७ टक्के जादा क्षेत्रफळ देत असल्याचा केलेला दावा फसवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. धारावीकरांची ५०० चौरस फुटाची मागणी असली तरी ४०५ चौरस फुटापर्यंत धारावीवासीयांना घर देण्याची शासनाचीही तयारी असल्याचेही या घडामोडींशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहरातील झोपडीवासीयांना आतापर्यंत मिळालेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत मिळालेल्या घरापेक्षा मोठे घर दिले जाणार असल्याचा दावा अदानी समुहाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला होता. परंतु या घोषणेत नवीन काहीही नाही. धारावी पुनर्विकासाबाबत २०१५ मध्ये झालेल्या बैठकीत धारावीवासीयांना ३५० चौरस फुट घर देण्याचा उल्लेख आहे. याबाबतचे पत्र ‘लोकसत्ता’कडे आहे. त्यामुळे धारावीतील एका विभागाचा पुनर्विकास त्यावेळी करणाऱ्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) पहिली इमारत ३०० चौरस फुटांच्या सदनिकांची बांधली तर नंतरच्या इमारतींमध्ये ३५० चौरस फुटांच्या सदनिका उपलब्ध करुन दिल्या, याकडे या सूत्रांनी लक्ष वेधले.

हेही वाचा… वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची नियमावली जाहीर; तातडीने अंमलबजावणी करणार

म्हाडाने आतापर्यंत धारावी पुनर्विकासात पाच इमारती बांधल्या आहेत. त्यापैकी ३०० चौरस फुटाच्या सदनिका असलेल्या इमारतींमध्ये रहिवासी राहण्यासाठीही गेले आहेत तर दोन क्रमांकाची इमारत नागरी नूतनीकरण प्रकल्पांतर्गत बांधण्यात आली असून या इमारतीत ४०५ चौरस फुटाच्या सदनिका आहेत. मात्र तीन, चार आणि पाच क्रमांकाच्या इमारतीत ३५० चौरस फुटाच्या ८२५ सदनिका उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या इमारती धारावीवासीयांसाठी आहेत. मात्र धारावीत एकत्रित पुनर्विकास करण्याचे ठरल्यानंतर या इमारती पडून आहेत.

म्हाडा बांधलेल्या इमारतींचे काय होणार याबाबत अदानी समुहाच्या प्रवक्त्याला विचारले असता, याबाबत आपण माहिती घेऊ, असे त्याने सांगितले. ३५० चौरस फुटाची सदनिका धारावीवासीयांना दिली जाणार असल्याच्या घोषणेबाबत मात्र या प्रवक्त्याने अधिक काही स्पष्ट करण्यास नकार दिला. महापालिका चाळी तसेच खासगी चाळवासीयांना ४०५ चौरस फुटापर्यंत घर देण्याचा विचार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. धारावी बचाव आंदोलनाचे अ‍ॅड. राजू कोरडे यांनीही ३५० चौरस फुट घर देण्याची घोषणा नवी नसल्याचे सांगितले. फंजीबल चटईक्षेत्रफळासह धारावीकरांना ४०५ चौरस फुटाचे घर सहज मिळू शकते. बीडीडी चाळवासीयांसाठी ५०० चौरस फुटाच्या घराची तरतूद केली गेली. धारावीकरांसाठीही ते सहज शक्य आहे, याकडे कोरडे यांनी लक्ष वेधले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Provision of 350 square feet house to dharavi residents by the government the claim of 17 percent excess area is misleading mumbai print news dvr