मूलभूत संशोधनाला महत्त्व द्यायलाच हवे, अन्यथा अनेक गोष्टींसाठी आपल्याला दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागेल, असे सांगतानाच केंद्र सरकारने विज्ञान-तंत्रज्ञानासाठी निदान एक टक्का तरी अर्थसंकल्पीय तरतूद करावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ प्रा. जयंत नारळीकर यांनी येथे बोलताना केले.
खगोल मंडळ आणि रुईया महाविद्यालयाच्या वतीने प्रा. जयंत नारळीकर यांच्याशी मुक्त संवाद या कार्यक्रमाचे आयोजन रुईया महाविद्यालयाच्या सभागृहात रविवारी करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे दैनिक ‘लोकसत्ता’ आणि साप्ताहिक ‘लोकप्रभा’ माध्यम प्रायोजक आहेत.
 खगोल मंडळाचे दिलीप जोशी आणि डॉ. अभय देशपांडे यांनी प्रा. जयंत नारळीकर यांची मुलाखत घेतली. तत्पूर्वी, नारळीकर यांचा सन्मान करताना रुईया महाविद्यालयाच्या उपप्राचार्या अनुश्री लोकूर, खगोल मंडळाचे अध्यक्ष सागर केरकर, प्रदीप नायक व्यासपीठावर उपस्थित होते.
सध्या विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रासाठी केंद्र सरकार राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या ०.८ टक्के खर्च केला जातो. अनेक देशांमध्ये हा खर्च राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या १ ते २ टक्के असतो. म्हणून आपल्याकडेही किमान एक टक्का खर्च विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रासाठी करायला हवा, अशी अपेक्षा प्रा. नारळीकर यांनी व्यक्त केली.
मातृभाषेतूनच विज्ञानविषयक संकल्पना लहानपणी मुलांना अधिक चांगल्या तऱ्हेने समजू शकतात. म्हणून मातृभाषेतूनच शालेय शिक्षण घेतले पाहिजे, असे मत त्यांनी मुलाखतीत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केले.
आपल्या तिन्ही मुलींना अमुक एक विषयच शिका असे न सांगता कोणत्याही विषयाचा स्वत: अभ्यास करा, क्लासला जाऊ नका असे आपण सांगितले, कारण त्याचा उपयोग पुढील आयुष्यात उच्च शिक्षण घेताना, संशोधन करताना किंवा कोणताही एक विशिष्ट विषय धसास लावण्यासाठी होतो, अशी आपली धारणा असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

Story img Loader