‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’ची (एमपीएससी) पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची आणि ‘केंद्रीय लोक सेवा आयोगा’ची (यूपीएससी) मुख्य परीक्षा एकाच दिवशी म्हणजे ८ डिसेंबरला आल्याने जे उमेदवार या दोन्ही परीक्षांना बसले आहेत त्यांना कुठल्या तरी एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. त्यामुळे उमेदवारांकडून पीएसआय परीक्षेची तारीख बदलण्याची मागणी होत आहे.
एमपीएससीच्या पोलीस उपनिरीक्षक पदासाठीच्या मुख्य परीक्षेला राज्यभरातून सुमारे आठ हजार उमेदवार बसत आहेत. राज्यात चार  केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. या उमेदवारांपैकी काही जण यूपीएससीची मुख्य परीक्षाही देणार आहेत. पण, या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी म्हणजे ८ डिसेंबरला आल्या आहेत. जे उमेदवार या दोन्ही परीक्षांकरिता पात्र ठरले आहेत त्यांना कुठल्या तरी एका परीक्षेला मुकावे लागणार आहे.
पोलीस उपनिरीक्षक पदाच्या मुख्य परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम परीक्षेच्या तोंडावरच बदलण्यात आल्याने आधीच उमेदवारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यात पुन्हा ही परीक्षा यूपीएससीच्या मुख्य परीक्षेच्या दिवशीच आल्याने काही उमेदवारांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
या संदर्भात एमपीएससीचे अध्यक्ष सुधीर ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी परीक्षेची तारीख बदलण्याची मागणी फेटाळून लावली. एमपीएससीने आपल्या परीक्षांचे वेळापत्रक एक वर्ष आधीच जाहीर
केले होते. त्यामुळे, तारीख बदलणे शक्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.