अपंगत्व आलेल्या, उपचार अशक्य असलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना आधार
शैलजा तिवले
मुंबई : करोनामुक्त झालेल्या आणि म्युकरमायोकोसिसच्या आजाराने ग्रस्त झालेल्या रुग्णांना या नव्या आजाराविषयी माहिती देण्यासाठी, आजारामुळे झालेल्या परिणामांचा स्वीकार करणे शक्य व्हावे यासाठी केईएममध्ये मानसोपचार सुरू करण्यात आले आहेत.
केईएममध्ये उपचारासाठी आलेल्या रुग्णांमध्ये म्युकरचा संसर्ग वाढला आहे. अनेकांमध्ये ही बुरशी टाळू, सायनस, गालाची हाडे इथे पसरलेली असते. काही रुग्णांमध्ये तर या बुरशीने नाकपुडय़ांमधील पडदाही नष्ट झाल्याचे दिसून आले आहे. या रुग्णांमध्ये बुरशीमुळे तोंड आणि नाकामध्ये झालेले परिणाम डोळ्यांनी पाहणेही त्रासदायक असते. काही रुग्णांमध्ये तर बुरशीची तीव्रता वाढल्याने डोळा किंवा तोंडातील काही भाग काढून टाकल्याने अपंगत्व येते. रुग्णांसाठी या आजारामुळे अचानकपणे आलेले अपंगत्व किंवा पाहताही येणार नाही, अशी विद्रूप अवस्था अनुभवण्यास आल्याने मोठा धक्का बसतो. उपचार अशक्य असलेल्या रुग्णांमध्ये तर याहून वाईट स्थिती असून या रुग्णांना सावरण्यासाठी मानसोपचार विभागाची मदत घेतली जात आहे, अशी माहिती केईएममधील कान, नाक, घसा विभागाच्या प्रमुख डॉ. हेतल मारफतिया यांनी दिली.
‘म्युकरमायकोसिसचा आजार सर्वसामान्य नसल्यामुळे या आजाराविषयी अनेक गैरसमज रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये असतात. तेव्हा म्युकरने बाधित रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना आजार आणि उपचाराविषयी योग्य माहिती देऊन समुपदेशन केले जाते’, असे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले.
‘कर्करोग किंवा अन्य गंभीर आजारांविषयी आता बरीच प्राथमिक माहिती रुग्णांपर्यंत पोहचल्याने त्यांना या आजाराच्या तीव्रतेविषयी ज्ञान आहे. परंतु म्युकर हा आजार सर्वसामान्यांसाठी तसा नवीन असल्याने रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना याची तीव्रता लक्षात येत नाही. त्यामुळे या आजाराने अपंगत्व आल्यास किंवा उपचार अशक्य असल्यास सुरुवातीला रुग्ण आणि नातेवाईक सत्य स्थिती स्वीकारण्यास तयार नसतात. मग हळूहूळ बरे होण्यासाठी अन्य काही पर्याय आहेत का, किंवा अन्य रुग्णालयात गेले तर होईल का याची विचारणा करायला लागतात. यातूनही काही होणार नाही, असे लक्षात आल्यावर रुग्णांमध्ये नैराश्य आणि चिडचीड वाढायला लागते. ते नातेवाईक किंवा डॉक्टरांना दोष द्यायला सुरुवात करतात. या सर्व स्थितीतून जात असताना रुग्णाला आणि त्याच्या नातेवाईकांना मानसिक आधाराची गरज असते. म्हणूनच म्युकरबाधित रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्याशी आम्ही संवाद साधतो. मागील दोन आठवडय़ांपासून रुग्णांसाठी सुविधा सुरू केली असून आतापर्यंत ५० हून अधिक रुग्णांना उपचार दिलेले आहेत’, असे केईएमच्या मानसोपचार विभागाच्या प्रमुख डॉ. अजिता नायक यांनी सांगितले.
नातेवाईकांचे समुपदेशन आवश्यक
‘रुग्णालयात दाखल असलेले बहुतांश रुग्ण हे आधी करोनाबाधित झालेले होते. त्यामुळे अनेकांना त्या आजारातून उठल्यावर म्युकरने गाठल्याचा धक्का मोठय़ा प्रमाणात बसलेला आहे. तेव्हा समुपदेशनामुळे त्यांना यातून बाहेर पडण्यात मदत होते. प्रथम आजाराची प्राथमिक माहिती, आजाराची तीव्रता वाढल्यास शरीरावर होणारे परिणाम इत्यादी माहिती नातेवाईक आणि रुग्णांना यात दिली जाते. नातेवाईकांना मानसिकदृष्टय़ा सक्षम करण्याची गरज असते. कारण हे रुग्ण पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून असतात. त्यामुळे नातेवाईक धीराने उभे राहिले तर रुग्णाला हळूहळू धक्कय़ातून सावरायला मदत होते’, असे डॉ. नायक यांनी सांगितले.
डॉक्टरांनाही मानसोपचाराची आवश्यकता
म्युकरचे रुग्ण गेल्या दोन महिन्यात झपाटय़ाने वाढले असून दोन महिन्यांत जवळपास ६० शस्त्रक्रि या केलेल्या आहेत. यातील जवळपास ६० टक्के रुग्णांना भूल देणे शक्य झालेले नाही. रुग्णांना उपचार देऊनही रुग्ण बरे होत नाहीत, काही रुग्ण उपचारांच्या पलीकडे गेले हे पाहून आम्हीही हतबल झालो आहोत. त्यामुळे आता आम्हालाही मानसोपचाराची आवश्यकता आहे, असे मत रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यक्त केले.