साडेअकरा लाख निराशाग्रस्त

देशातील ४३ शासकीय मनोरुग्णालयांत केवळ महिलांचीच नव्हे तर पुरुष मनोरुग्णांचीही परवड होत असते. बहुतेक शासकीय रुग्णालयांमध्ये पुरेसे मनोविकारतज्ज्ञ नाहीत. तसेच प्रशिक्षित परिचारिकांचाही अभाव आहे. लहान मुलांपासून वयोवृद्धांच्या मानसिक आजारांचे वेगवेगळे प्रकार असून शहरी व ग्रामीण भागातील मानसिक आजारांची कारणेही वेगवेगळी असताना चार लाख लोकसंख्येमागे अवघा एक मनोविकारतज्ज्ञ असे प्रमाण भारतात आहे.

एकीकडे मानसिक आजारावरील उपचाराची गरज मोठय़ा प्रमाणात वाढत असताना केंद्र शासनाकडून या आजारावरील उपचाराचा खर्च अत्यल्प आहे. देशभरातील ४३ मनोरुग्णालयांमध्ये अवघ्या १७,८२५ खाटा असून रुग्णांची संख्या जवळपास दुप्पट असल्याचे दिसून आले आहे. खाटा व रुग्णांचे प्रमाण कमालीचे व्यस्त असून एक लाख लोकांमागे १,४६० असे खाटांचे प्रमाण आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या २०१३च्या अहवालात चीन व भारतातील वेगवेगळ्या मानसिक आजारांच्या रुग्णांच्या संख्येची तुलना करण्यात आली आहे. स्किझोफ्रेनियाचे चीनमध्ये पाच लाख २१ हजार रुग्ण असून भारतात एक लाख ६३ हजार एवढे रुग्ण आहेत. नैराश्याने ग्रासलेल्या रुग्णांची संख्या भारतात साडेअकरा लाख एवढी आहे तर चीनमध्ये दहा लाख लोक नैराश्याने ग्रासलेले आहेत. चिंताग्रस्त मनोरुग्णांची संख्या दोन्ही देशांत सुमारे साडेतीन लाख एवढी नोंदविण्यात आली आहे. दर लाख लोकांमागे चीनमध्ये १.७ एवढे सायकॅट्रिक तज्ज्ञ आहेत तर भारतात हेच प्रमाण ०.३ एवढे आहे. दिल्लीमध्ये ‘राष्ट्रीय महिला आयोग’ आणि ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ मेंटल हेल्थ’ यांच्या अभ्यासातून देशातील शासकीय मनोरुग्णालयांमधील महिला रुग्णांच्या करण्यात आलेल्या अभ्यासात महिला रुग्णांच्या दुरवस्थेचा पंचनामा करण्यात आला असून अनेक उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. तथापि यासाठी लागणारा निधी कोण उपलब्ध करून देणार या कळीच्या प्रश्नावर कोणाकडेही ठोस उत्तर नाही.

पुणे मनोरुग्णालयात २५४० खाटा असून दाखल होणाऱ्या रुग्णांची सरासरी संख्या तीन हजार एवढी आहे. ठाणे मनोरुग्णालयात १८५० खाटा असून सरासरी तेवढेच रुग्ण दाखल आहेत. रत्नागिरी येथे ३६५ खाटा असून येथे दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सरासरी दोन हजार एवढे आहे. नागपूर येथे ९४० खाटा असून ही सर्व रुग्णालये ब्रिटिश काळात बांधण्यात आली आहेत.

या रुग्णालयांचे नव्याने बांधकाम करण्याची आवश्यकता असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. त्यासाठी सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या रुग्णालयांमघ्ये डेकेअर सेंटर, रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्याची व्यवस्था, तसेच पुनर्वसन केंद्र निर्माण करण्याची नितांत गरज असताना त्याबाबत गांभीर्याने पाहण्यास कोणी तयार नाही असे आरोग्य विभागातीलच ज्येष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पुणे मनोरुग्णालयातील एकूण ९५४ मंजूर पदांपैकी १८९ पदे रिक्त आहेत. यामध्ये मनोविकारतज्ज्ञांची दहा पदे रिक्त आहेत. ठाणे मनोरुग्णालयात ७२३ पदांपैकी १२२ पदे रिक्त आहेत. नागपूर येथे ७५ तर रत्नागिरी येथे १७ पदे रिक्त आहेत. या चारही प्रमुख रुग्णालयात मिळून ४६२ पदे रिक्त असल्याचे लक्षात घेतल्यास रुग्णसेवेचा दर्जा काय असू शकतो याचा अंदाज बांधता येईल.  (उत्तरार्ध)

ल्ल  महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाल्यास राज्यात पुणे, ठाणे, नागपूर व रत्नागिरी अशी चार प्रमुख मनोरुग्णालये आहेत. प्रत्येक जिल्हा रुग्णालयात काही खाटा मनोरुग्णांसाठी राखून ठेवण्यात आल्या आहेत.

  • जिल्हा रुग्णालयात कागदावर मनोविकारतज्ज्ञांची पदे दाखविण्यात आली असली तरी यातील निम्मी पदे भरण्यातच आलेली नाहीत.
  • चारही प्रमुख मनोरुग्णालयांतही अशीच स्थिती असून, पदव्युत्तर मनोविकारतज्ज्ञांचे प्रमाण अत्यल्प आहे.

Story img Loader