जयपूर घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि संगीतज्ञ पंडित दिनकर पणशीकर यांचे सोमवारी दुपारी ४ वाजता निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात तबलावादक पुत्र शंतनू पणशीकर आणि सतारवादक पुत्र भूपाल पणशीकर असा परिवार आहे.
गेल्या आठवडय़ात मेंदूत रक्तस्राव झाल्याने पंडित दिनकर पणशीकर यांना अंबरनाथ येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
नटवर्य प्रभाकर पणशीकर आणि ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे ते धाकटे बंधू होत. पंडित पणशीकर यांनी पंडित निवृत्तीबुवा सरनाईक यांच्याकडून जयपूर घराण्याची गायकी आत्मसात केली. पं. सुरेशराव हळदणकर, पं. वसंतराव कुलकर्णी हेसुद्धा त्यांचे गुरू होत. ‘आडा चौताला’सारख्या कमी प्रचलित तालात त्यांनी रचलेल्या २०० बंदिशी हा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रासाठी बहुमूल्य ठेवा मानला जातो.
पंडित दिनकर हे ‘गोवा कला अकादमी’चे संगीत विभागप्रमुख होते. या माध्यमातून शेकडो शिष्य त्यांनी घडवले. गोवा राज्य पुरस्कार, ‘कोलकाता संगीत रिसर्च अकादमी पुरस्कार’ यांसह षडाक्षरी गवई, गानवर्धन, चतुरंग संगीत सन्मान पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन २०१७मध्ये केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने त्यांना पाठय़वृत्ती प्रदान केली होती.