लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा (पोस्को) २०१२ जनजागृती सप्ताहाला सोमवारपासून सुरुवात झाली असून पोस्को जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने या कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी, मुलांच्या सुरक्षिततेसाठी महामुंबई मेट्रो संचलन महामंडळ लिमिटेड (एमएमएमओपीएल) आणि अर्पण या सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. या कायद्याबाबतची संपूर्ण माहिती देणारी एक विशेष मेट्रो गाडी तयार करण्यात आली आहे. ही विशेष मेट्रो गाडी सोमवारपासून ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ या मार्गिकांवर धावत आहे. तर ही गाडी २५ नोव्हेंबरपर्यंत या मार्गिकेवर धावणार आहे.
बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करण्यासाठी आणि अशा गुन्ह्यांमधील गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी पोस्को २०१२ कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्याची कडक अंमलबजावणी होत असली तरी अद्यापही बाल लैगिंक अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. अनेकदा पालक अशा अत्याचारानंतर गुन्हा नोंदविण्यासाठी पुढे येत नाहीत. ही बाब लक्षात घेत या कायद्याबाबत जनजागृतीची गरज आहे, तर मुलांना (० ते १८ वयोगट) वैयक्तिक सुरक्षा शिक्षण – प्रशिक्षण देणेही गरजेचे आहे. याबाबत जनजागृती पालक-नागरिकांमध्ये व्हावी यासाठी पोस्को जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार एमएमएमओपीएल आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधासाठी काम करणाऱ्या अर्पण संस्थेने पुढाकार घेऊन जनजागृती कार्यक्रम हाती घेतला आहे. पोस्को कायद्याची संपूर्ण माहिती देणारी, मुलांच्या वैयक्तिक सुरक्षेबाबतचे प्रशिक्षण-शिक्षणाबाबतची माहिती देणारी एक विशेष मेट्रो गाडी एमएमएमओपीएल आणि अर्पणने तयार केली आहे.
आणखी वाचा-मतदान केंद्रावर मोबाइल बंदीमुळे मतदान कमी होण्याची भीती
पोस्को कायद्याबाबतची माहिती देणारी, या कायद्याबाबतची जनजागृती करणारी ही विशेष मेट्रो गाडी सोमवारपासून (१८ नोव्हेंबर) ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकांवर धावत आहे. मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषांमधून पोस्को कायद्यासंबंधीची संपूर्ण माहिती मेट्रो गाडीत आणि बाहेर झळकविण्यात आली आहे. ही विशेष मेट्रो गाडी २५ नोव्हेंबरपर्यंत या मार्गिकांवर धावणार आहे. या कायद्याबाबत जनजागृती करणे आणि बाल लैंगिक अत्याचार रोखले जावेत अशी अपेक्षा यानिमित्ताने एमएमएमओपीएल आणि अर्पण संस्थेकडून व्यक्त केली जात आहे.