मुंबई : विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांतर्गत अंधेरीमधील नित्यानंद मार्ग महानगरपालिका शाळेत शुक्रवारी जनजागृती करण्यात आली. यावेळी पालक सभेचे आयोजन करून विद्यार्थ्यांसह उपस्थित पालकांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. तसेच, त्यांना मतदान करण्याविषयी शपथ देण्यात आली.
हेही वाचा – मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील ४४ पूल व भुयारी मार्गांची दुरुस्ती
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार जिल्हा निवडणूक अधिकारी तथा मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वीप’ उपक्रमांतर्गत मुंबई शहर आणि दोन्ही उपनगरांत मतदानासंदर्भात व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून मतदानाचा हक्क बजावावा, या उद्देशाने उपक्रम राबविला जात आहे. याच पार्श्वभूमीवर, नित्यानंद मार्ग महानगरपालिका शाळेत पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता, निर्भयपणे मतदान करेन, अशी शपथ यावेळी उपस्थित पालक आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आली. मतदानासंदर्भात जनजागृती करणारे पोस्टर्स हातात घेऊन विद्यार्थ्यांनीही पालकांना प्रोत्साहित केले. यावेळी महानगरपालिकेचे उपआयुक्त विश्वास मोटे, उपशिक्षणाधिकारी निसार खान, निरीक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालक उपस्थित होते.