सरकारच्या निष्क्रियतेविरोधात जनतेमधील असंतोष तीव्र झाला असून पिण्याच्या पाण्यासाठी महिलांनी हंडे घेऊन थेट मंत्रालयावर मंगळवारी धडक मारली. वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याविरूध्द विनयभंगाची तक्रार देऊनही त्याची दखल घेतली जात नसल्याने आणि त्यासाठी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांची भेट न मिळाल्याने निराश झालेल्या औरंगाबादच्या महिला पोलिसाने विधानभवनाच्या दारात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तर भंडारा येथील तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून त्यांची हत्या करणाऱ्या आरोपींना पकडण्याच्या मागणीसाठी आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयापुढे निदर्शने केली. जोरदार घोषणाबाजी व आंदोलनांमुळे विधानभवन आणि मंत्रालय परिसर दणाणून गेला. त्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली.
दुष्काळ, महिलांची सुरक्षा, त्यांच्यावरील अत्याचार आणि तक्रारींची दखल घेतली जात नसल्याने सर्वसामान्य जनता त्रासली आहे. सरकारी पातळीवर दुष्काळ व अन्य बाबींवर केवळ चर्चाच सुरू असून ठोस उपाययोजना आणि त्यांचा दृश्य परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे संतापाचा उद्रेक होत आहे. सांगोला, पंढरपूर परिसरात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. पाण्याच्या मागणीसाठी या परिसरातील महिलांनी आझाद मैदानावर गेले २४ दिवस उपोषण केले होते. पण सरकारी पातळीवरून त्याची साधी दखलही घेतली गेली नाही. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांच्या नेतृत्वाखाली काही महिलांनी बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पाण्याचे हंडे घेऊन मंत्रालयावर धडक मारली आणि मुख्य दरवाजातून आत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांना पोलिसांनी रोखून धरले. पण महिलांनी अचानक आंदोलन केल्याने पोलिसांची धावपळ उडाली. नियंत्रण कक्षाकडून अतिरिक्त कुमक मागविण्यात आली. ती येण्यात सुमारे २० मिनिटे गेली. तोपर्यंत महिलांनी सरकारच्या निष्क्रियतेविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणून गेला. पोलीस कुमक आल्यावर या महिलांना ताब्यात घेऊन हटविण्यात आले.
याच दरम्यान रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भंडारा येथील अल्पवयीन मुलींवरील बलात्कार व हत्येप्रकरणी मंत्रालयापुढे रास्ता रोकोचा प्रयत्न केला. महिलांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात असल्याने त्यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करुन घोषणाबाजी केली. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. विधिमंडळ अधिवेशनाचे कामकाज ठरविण्याबाबतच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर.आर. पाटील विधानभवनात होते. त्याचवेळी अमृता अकोलकर या महिला पोलिसाने सायंकाळी पाचच्या सुमारास विधानभवनाच्या दारात विष घेण्याचा प्रयत्न केला. तिला मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांची भेट न मिळाल्याने तिने हा प्रकार केल्याचे सांगितले जात आहे. ही महिला पोलिस शिपाई औरंगाबादची असून उपायुक्त संदीप भाजीभाकरे आणि दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरूध्द तिने लैंगिक सतावणूक व विनयभंगाची तक्रार महिला आयोगाकडे व वरिष्ठांकडेही केली होती. पण त्याची दाद न लागल्याने तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. अधिवेशनाची तयारी सुरू असतानाच विधानभवनाच्या दारात हा प्रकार झाल्याने पोलिसांची धावपळ झाली.