मुंबई : शीव रुग्णालयामध्ये विविध इमारतींच्या दुरुस्तीचे, तसेच नव्याने इमारत उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. परिचर्या प्रशिक्षण केंद्राची इमारत जुनी झाली असून नवीन इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. मात्र नव्याने उभारण्यात येत असलेल्या इमारतीचे काम मागील सहा महिन्यांपासून संथगतीने सुरू आहे. नुकताच पदभार स्वीकारलेले उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे यांनी शीव रुग्णालयाला भेट देऊन या कामाचा आढावा घेतला. तसेच परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचे काम १ मेपर्यंत पूर्ण करून इमारत मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरित करण्याचे आदेश त्यांनी दिले.

मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपायुक्त संजय कुऱ्हाडे यांची बदली झाल्यानंतर पदभार स्वीकारलेल्या उपायुक्त शरद उघडे यांनी बुधवारी दुपारी शीव रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयामध्ये सुरू असलेल्या बांधकामांचा त्यांनी यावेळी आढावा घेतला. यावेळी उपअधीष्ठाता डॉ. घनश्याम आहुजा व डॉ. विद्या महाले उपस्थित होते. परिचर्या प्रशिक्षण केंद्राचे काम संथगतीने सुरू असून या कामाचाही त्यांनी आढावा घेतला.

परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचे काम कंत्राटदार राहुल वालिया याला दिले आहे. मात्र काम पूर्ण करण्यास दोन वेळा मुदतवाढ देऊनही कंत्राटदाराने काम पूर्ण केले नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. यावेळी उघडे यांनी कंत्राटदाराला काम पूर्ण करण्यासाठी १ मे रोजीपर्यंत मुदत दिली. यापूर्वी कंत्राटदाराला ही इमारत पूर्ण करण्यासाठी डिसेंबर २०२४ पर्यंतची मुदत देण्यात आली होती.

मात्र काम पूर्ण न झाल्यामुळे इमारतीचा उद्घाटन सोहळा पुढे ढकलण्यात आला. तसेच इमारतीचे काम पूर्ण करण्यासाठी नवी मुदत दिली होती. मात्र त्या मुदतीमध्ये काम पूर्ण न झाल्याने आता पुन्हा मुदतवाढ देण्यात आली असून, इमारतीमध्ये अद्याप बरीच किरकोळ कामे शिल्लक आहेत. त्यामुळे दिलेल्या मुदतीमध्ये ही कामे पूर्ण होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

डॉक्टरांच्या निवासाचीही व्यवस्था शीव रुग्णालयामध्ये परिचर्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी परिचर्या प्रशिक्षण केंद्राची इमारत उभारण्यात येत आहे. यामध्ये रुग्णालयात कार्यरत परिचर्यांचे कार्यालय, तसेच रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या राहण्याची सोय करण्यात येणार आहे. त्यामुळे या इमारतीचे काम तातडीने पूर्ण होणे गरजेचे असल्याचे शरद उघडे यांनी सांगितले. नव्या इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर सध्या असलेली परिचर्या प्रशिक्षण केंद्राची इमारत तोडण्यात येईल. त्या जागेवर रुग्णांच्या सोयी-सुविधांसाठी नवीन इमारत उभारण्यात येणार आहे.