लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : सण आणि उत्सवांत मिरवणुकीसह इतर समारंभासाठी प्रखर दिव्यांचा वापर (लेझर बीम), कर्णकर्कर्श डिजेचा सर्रास वापर करण्याला उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. उत्सवांतील लेझर बीम आणि डीजेच्या वापरामुळे अनेकांची दृष्टी आणि श्रवण क्षमतेवर परिणाम झाला असून काहींना कायमची दृष्टी गमवावी लागली आहे. त्यामुळे, लेझर बीम आणि डिजेच्या वापराबाबात योग्य आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतने दाखल केलेल्या या जनहित याचिकेची मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने गंभीर दखल घेतली. तसेच, उत्सवादरम्यान ध्वनी प्रदुषणाच्या नियमावलींचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन होत असल्याचे याचिकाकर्त्यांनी केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या निदर्शानास आणून द्यावे अथवा त्याबाबत माहितीचा समावेश असलेले निवेदन सादर करावे, असे आदेश न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिले. त्यानंतर, दोन्ही प्रदुषण नियंत्रण मंडळांनी त्या अनुषंगाने योग्य ती कारवाई करावी व उपाययोजना कराव्यात, असे आदेश दिले.
आणखी वाचा-मुंबई: ‘एमएमआरडीए’, ‘एमएसआरडीसी’वर जबाबदारी; ५१,५१७ झोपड्यांचे पुनर्वसन
तत्पूर्वी, सणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या घातक लेझर बीममुळे अनेकांची दृष्टी गेली आहे. शिवाय, डीजे आणि तत्सम उपकरणांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदुषणामुळे अनेकांची श्रवणशक्ती कमी झाली आहे. डीजे वाजवला जात असताना अनेकांच्या ह्रदयाचे ठोके वाढल्याचे प्रकारही घडले आहेत. डीजेमुळे निर्माण होणाऱ्या अतितीव्र ध्वनी लहरींमुळे आसपासच्या इमारतींमध्ये कंपने निर्माण होत असल्याचे याचिकाकर्त्यांच्या वतीने वकील सत्येंद्र मुळ्ये यांनी न्यायालयाला सांगितले. लेझर बीममुळे उद्भवणारा धोका दूर करण्यासाठी कोणतीही विशिष्ट नियमावली नाही. त्यासंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी, निवेदन देऊनही कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे, न्यायालयाने या प्रकरणी हस्तक्षेप करून प्रतिवाद्यांना योग्य आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकाकर्त्यांच्या वतीने न्यायालयाकडे करण्यात आली.
याचिकाकर्त्यांच्या या युक्तिवादांची मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने गंभीर दखल घेतली. तसेच, केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाचे वकील अभिनंदन वग्यानी व सरकारी वकील प्रियभूषण काकडे यांच्याकडे त्याबाबत विचारणा केली. त्यावर, डीजे आणि तत्सम उपकरणांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदुषणाच्या तक्रारींची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येते, मात्र, लेझर बीमसंदर्भात माहिती घ्यावी लागेल, असे केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या वतीने वग्यानी यांनी न्यायालयाला सांगितले. त्याबाबत प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका स्पष्ट करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सरकारी वकिलांनीही प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका माडण्यात येईल, असे न्यायालयाला सांगितले.