मुंबई : धारावीतील अपात्र रहिवाशांच्या नावाखाली धारावीचा भूखंड अदानीला आंदण देण्याचा डाव असल्याचे आरोप करीत धारावीकर आक्रमक झाले आहेत. सरसकट धारावीतच आणि ५०० चौरस फुटाची घरे द्यावीत या मागणीसाठी धारावीकरांनी आंदोलन तीव्र केले आहे. येत्या ४ फेब्रुवारी रोजी धारावीत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी धारावी बचाव आंदोलनाकडून उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्यासह अन्य नेत्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे.
धारावीचा कायापालट करून धारावीकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी धारावी पुनर्विकास प्रकल्प हाती घेतल्याचे राज्य सरकारने जाहीर केले. मात्र आता अपात्र रहिवाशांच्या नावाखाली धारावीतील रहिवाशांना मुलुंडमध्ये हलविण्याचा आणि धारावीचा भूखंड अदानीला आंदण देण्याचा डाव आखल्याचा आरोप धारावीकरांनी केला आहे. मुलुंडमध्ये अपात्र धारावीकरांना घरे देण्यासाठी धारावी पुनर्वसन प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडने (डीआरपीपीएल) मुंबई महानगरपालिकेला पत्र पाठवले आहे. या पत्राद्वारे मुलुंडमधील ६४ एकर जागेची मागणी पालिकेकडे केली आहे. तर दुसरीकडे धारावीकरांची ५०० चौरस फुटाच्या घराची मागणी असताना त्यांना ३५० चौरस फुटाचे घर देण्याचे डीआरपीपीएलने जाहीर केले आहे. यावर धारावीकर संतापले असून त्यांनी आता आंदोलनाची हाक दिली आहे. धारावीत शुक्रवारी आयोजित बैठकीत ४ फेब्रुवारीला जाहीर सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती धारावी बचाव आंदोलनाचे समनव्यक बाबुराव माने यांनी दिली.
हेही वाचा – मुंबई : सहा कोटींच्या कोकेनसह परदेशी नागरिकाला अटक
धारावी पुनर्विकासाचा पहिला शासन निर्णय ४ फेब्रुवारी २००४ रोजी काढण्यात आला होता. त्याला २० वर्षे पूर्ण होत आहे, याचे औचित्य साधत धारावीकरांच्या न्याय मागण्यासाठी ४ फेब्रुवारीला ९० फूट रोड येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आल्याचे धारावी बचाव आंदोलनाचे समन्वयक राजू कोरडे यांनी सांगितले. तर या सभेला हजारो धारावीकर हजर राहतील. तसेच उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्यासह अन्य काही नेत्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. लवकरच ३५० चौरस फुटाच्या घराच्या अधिसूचनेची होळीही करण्यात येणार आहे.