मुंबई : मुंबई महानगरपालिकेला लवकरच सात सहाय्यक आयुक्त मिळणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अखेर सात सहाय्यक आयुक्तांची शिफारस यादी आपल्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे. सहाय्यक आयुक्तांची सात पदे भरण्यासाठी उमेदवारांची यादी द्यावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतरही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस यादी न दिल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने नुकतीच आयोगाविरोधात अवमान याचिका दाखल केली होती. त्यानंतर आयोगाने सावध पवित्रा घेत सात उमेदवारांची यादी जाहीर केली. या सात उमेदवारांमध्ये एका महिलेचा समावेश आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांची नियुक्ती लोकसेवा आयोगामार्फत केली जाते. या पदावर बढतीने नियुक्ती दिली जात नाही. जून २०२१ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त पदाच्या १६ जागांसाठी जाहिरात दिली होती. त्यानंतर उमेदवारांची चाचणी परीक्षा, लेखी परीक्षेचा निकाल, कागदपत्रांची पडताळणी, मुलाखती अशी सर्व प्रक्रिया पार पाडण्यात आली होती. मात्र कागद पडताळणीनंतर अपात्र उमेदवारांनी या भरती प्रक्रियेतील नऊ उमेदवारांविरोधात याचिका दाखल केल्या होत्या. त्यामुळे ही भरती प्रक्रिया न्यायप्रविष्ट होती. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते. सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट २०२४ मध्ये सात उमेदवारांची शिफारस यादी पालिकेला देण्याचे आदेश दिले होते. मात्र आयोगाने ही शिफारस यादी न दिल्यामुळे पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी आयोगाला खरमरीत पत्र लिहून उमेदवारांची यादी देण्याची मागणी सप्टेंबर महिन्यात केली होती. त्याकडेही आयोगाने काणाडोळा केल्यामुळे अखेर पालिका प्रशासनाने कठोर निर्णय घेत नुकतीच सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. ही याचिका दाखल करून घेत सर्वोच्च न्यायालयाने ४ नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी ठेवली होती. मात्र त्याआधीच शुक्रवारी संध्याकाळी लोकसेवा आयोगाने सात उमेदवारांची यादी संकेतस्थळावर जाहीर केली. त्यामुळे परीक्षा उत्तीर्ण होऊनही गेली तीन वर्षे वाट पाहणाऱ्या उमेदवारांनी आनंद व्यक्त केला.

हेही वाचा – पनवेलमधील आरोपीच्या घरातून पिस्तुल जप्त

महानगरपालिकेतील सहाय्यक आयुक्त पदाच्या ५० टक्के जागा रिक्त आहेत. एकूण ३५ पदांपैकी केवळ १७ पदे भरलेली आहेत. तर उर्वरित १८ पदांपैकी ११ पदांवर कार्यकारी अभियंत्यांना अथवा उपप्रमुख अभियंत्यांना अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. तर सहाय्यक आयुक्तपदी सध्या असलेले काही अधिकारी हे उपायुक्त पदासाठी पात्र झालेले आहेत. मात्र सहाय्यक आयुक्त पदासाठी उमेदवार मिळत नसल्यामुळे त्यांची बढती रखडली आहे. मुंबई महापालिकेतील सहाय्यक आयुक्तांची पदे रिक्त असल्याने पालिकेच्या सेवा प्रभावित होत आहे. त्यामुळे पालिकेने ही याचिका केली होती.

हे आहेत सात उमेदवार

दिनेश पल्लेवाड, नितीन चंद्रप्रताप शुक्ला, अर्जून सिदराम क्षीरसागर, उज्ज्वल यादवराव इंगोले, योगिता सहदेव कोल्हे, कुंदन रामसिंग वळवी, योगेश रणजीतराव देसाई.

हेही वाचा – मुंबई : वाहतुकीचे नियम पायदळी, ५५ रिक्षाचालकांविरोधात कारवाईचा बडगा

सहाय्यक आयुक्त पदासाठी सात उमेदवारांची यादी आयोगाने जाहीर केली आहे. या उमेदवारांच्या नियुक्तीबाबत आम्ही लवकरच आदेश काढू. मात्र या नियुक्तीला आचारसंहितेचा कोणताही अडसर नाही याबाबत आधी विचारणा करण्यात येईल. – भूषण गगराणी, मुंबई महानगरपालिका आयुक्त, प्रशासक