मुंबई : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती’ने दीड वर्षे मेहनतीने ‘जनता’ या वृत्तपत्राचे तीन खंड तसेच लेखन व भाषणमालेतील सहा खंडांचा मराठी अनुवाद तयार केला आहे. मात्र प्रकाशन कार्यक्रमास सरकारमधील उच्चपदस्थांना वेळ नसल्याने वाचकमोल असलेल्या खंडांचे प्रकाशन लांबणीवर पडले आहे.
सोमवारी १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने छापून तयार असलेल्या बाबासाहेबांच्या ९ खंडांचे प्रकाशन होणार होते. मात्र सरकारमधील उच्चपदस्थांकडून वेळ न मिळाल्याने हा कार्यक्रम लांबणीवर पडला. ‘मूकनायक’, ‘बहिष्कृत भारत’, ‘जनता’ व ‘समता’ या बाबासाहेबांनी सुरू केलेल्या वृत्तपत्रांपैकी जनता वृत्तपत्र (१९३० ते १९५६) अधिक काळ चालले. आंबेडकरी चळवळीचा इतिहास अभ्यासण्यासाठी ‘जनता’चे स्थान महत्त्वाचे आहे. याचे ६ खंड प्रकाशित आहेत. नवे तीन खंड (खंड ७, खंड ८, खंड ९) छापून तयार आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लेखन आणि भाषणे या मूळ इंग्रजी पाच खंडांचाही (खंड २, खंड ४, खंड ६, खंड ९, खंड १३) मराठी अनुवाद छापून तयार आहे. बाबासाहेबांच्या चरित्राची मूळ साधने उपलब्ध करून देण्यासाठी १९७६ मध्ये समिती स्थापन झाली. समितीला मुदतवाढ दिली गेली.
बऱ्याच कालावधीनंतर समितीला बाबासाहेबांचे नवे खंड वाचकांच्या हाती देण्यास यश आले. विभागाला याचे प्रकाशन मंत्रिमंडळ बैठकीनंतर लगेचच उरकायचे होते. समितीने स्वतंत्र प्रकाशनाचा आग्रह धरला. त्यामुळे जयंतीपूर्वी प्रकाशन नाही होऊ शकले. – ज. वि. पवार, सदस्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती
बाबासाहेबांच्या नव्या खंडांच्या प्रकाशनाला विलंब झालेला नाही. मंत्री कार्यालयाशी पत्रव्यवहार झाला आहे. या महिन्याच्या शेवटी मुख्यमंत्री आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री यांच्या हस्ते प्रकाशन होईल. – डॉ. प्रदीप आगलावे, सदस्य -सचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती