मराठी दिनदर्शिकेच्या विश्वात आपला स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या ‘आम्ही मुंबईकर-२०१४’ या दिनदर्शिकेचे प्रकाशन ३ डिसेंबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. दिनदर्शिकेची संकल्पना, संपादन राजेश कुलकर्णी यांनी केले आहे. मुंबईवरील अशा प्रकारची ही पहिली दिनदर्शिका असल्याचा दावा कुलकर्णी यांनी केला. वास्तुरंग प्रकाशनाने ही दिनदर्शिका प्रकाशित केली आहे.
या विषयी ‘लोकसत्ता’ला अधिक माहिती देताना कुलकर्णी यांनी सांगितले की, गेल्या वर्षी ‘मी बोरिवलीकर’ या विषयावर प्रकाशित करण्यात आलेल्या मराठी दिनदर्शिकेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे पुढील वर्षी ‘आम्ही मुंबईकर’ या विषयावरील मराठी दिनदर्शिका प्रकाशित करत आहोत. या दिनदर्शिकेत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, भारतकुमार राऊत, वि. वि. करमरकर, चंद्रशेखर संत यांच्यासह शिवसेना नेते आणि उद्योजक मनोहर जोशी, दीपक घैसास, चित्रकार वासुदेव कामत, लेखक डॉ. बाळ फोंडके, माजी पोलीस अधिकारी सुरेश खोपडे आणि अन्य मान्यवरांनी मुंबईवर लिहिलेले २२ लेख आहेत.
या शिवाय ‘मुंबईने आम्हाला काय दिले’ या विषयावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, आशा भोसले, पं. हरिप्रसाद चौरसिया, महेश मांजरेकर, मंगेश पाडगावक आणि विविध क्षेत्रातील मुंबईकर मान्यवरांचे मनोगतही देण्यात आले असल्याची माहितीही कुलकर्णी यांनी दिली.

Story img Loader