मुंबई: हॅलो, मुलुंड पोलीस ठाण्यामधून बोलतोय, नाहूर जंक्शनवर एक वृद्ध भिकारी गँगरीनने तडफडतोय… ठिक आहे, आम्ही लगेच येतो…. काही वेळातच तो सेवाव्रती व त्याचे मित्र घटनास्थळी पोहोचतात आणि लगेचच त्या वृद्घ भिकार्याच्या जखमांवर प्राथमिक उपचार करून तसेच त्याला स्वच्छ करून जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करतात… नुसते दाखल करून ही मंडळी गप्प बसत नाहीत तर नियमितपणे रुग्णालयात जाऊन तो बरा होईपर्यंत त्याला हवी नको ती सर्व मदत करतात…. रस्त्यावर बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचे कामही हे सेवाव्रती करत आहेत. करोनाच्या पहिल्या टप्प्यात लॉकडाऊनच्या काळात अनेकांना रुग्णालयातून मृतदेह घरी आणून देण्यापासून ते अंत्यसंस्कार करण्यापर्यंतचे काम या मंडळींनी केले आहे.
प्रामुख्याने ठाणे व मुंबई हे त्यांचे कार्यक्षेत्र आहे. या पट्ट्यात जर बेवारस मृत्यूची माहिती मिळाली तर ठाण्यातील ‘पुकार सेवा प्रतिष्ठान’चे हमराज जोशी हे लगेच मृतदेह पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतात. काही काळ शवागारातत मृतदेह ठेवून नातेवाईकांना शोधण्याचा प्रयत्न केला जातो व नंतर संस्थेच्यावतीने अंत्यसंस्कार करण्यात येतो. रस्त्यावरील निराधार आजारी वृद्ध रुग्णांची माहिती मिळताक्षणी हमराज जोशी व त्यांचे मित्रमंडळ जागेवर जाऊन त्या वृद्धावर प्राथमिक उपचार करतात. त्याला डेटॉलआदी लावून स्वच्छ करून स्थानिक शासकीय रुग्णालयात दाखल करतात.
हेही वाचा >>> जखमी गोविंदांवर विम्याविना उपचार, वैद्यकीय खर्चासाठी नातेवाईकांची पदरमोड
हमराज जोशी या चाळीशीच्या तरुणाचा हा निराधार वृद्धांच्या रुग्णसेवेचा व गरजुंवरील अंत्यसंस्काराला मदत करण्याचा प्रवास एका रात्रीतील नाही. विदर्भातील मर्तीजापूर येथून लहान असताना परिस्थितीवश मुंबईत आल्यानंतर त्याचाही प्रवास संघर्षाचा होता. यातूनच रेल्वे स्थानक व रस्त्यावरील हरवलेल्या वा घरातून पळून आलेल्या मुलांना शोधून त्यांना परत त्यांच्या घरी सोडण्याचे काम त्याने सुरु केले. ‘चाईल्ड लाईन १०९८’ ही संस्था तसेच ‘घर हो तो ऐसा’ या संस्थांसाठी जमेल तसे आपण काम करत होतो असे हमराज यांचे म्हणणे. परिस्थितीमुळे दहावीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर ट्रॅव्हल एजन्सी व तिकीट बुकिंगचे काम सुरु केले.एकीकडे घर चालविण्यासाठी हे काम सुरु असतानाच दुसरीकडे रस्त्यावरील निराधार वृद्ध रुग्णांना मदत करण्याचे काम सुरु होते. २००६ पासून सुरु झालेले हे कार्य करोना काळात आणखी वेगळ्या पद्धतीने सुरु झाले. करोनाच्या पहिल्या लाटेत मृतदेहावर अंत्यसंस्कार हे एक आव्हान होते. अनेकदा कुटुंबातील बहुतेकांना करोनाची लागण झाल्यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार करायचे कोणी हा प्रश्न निर्माण व्हायचा. भितीमुळे शेजारीपाजारी सोडाच पण मृतदेहाला खांदा द्यायला चार नातेवाईकही यायचे नाही. तेव्हा टाण्यातील मनसेच्या सहकार्याने हमराज जोशी यांनी अनेक कुटुंबाना मदत केली होती.
हेही वाचा >>> घाटकोपरमधील रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास; पहिल्या टप्प्यात २२ मजली आठ इमारतींची उभारणी
करोना काळात ठाणे व मुंबई परिसरातील अनेक मृतदेहांवर आम्ही अंत्यसंस्कार केल्याचे हमराज यांचे म्हणणे आहे. करोना काळात चांगल्या घरातील एकाकी राहणाऱ्या अनेक लोकांच्या मृतदेहांवर या सेवाव्रतींनी अंत्यसंस्कार केले आहेत. लॉकडाऊनच्या काळात तर रुग्णांना मदत करणे व वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणे हे एक आव्हान होते. दोन प्रकरणात वृद्धांची मुले परदेशात स्थायिक होती. त्यामुळे कोणाच्या तरी माध्यमातून त्यांनी परदेशातून फोन करून वडिलांवर अंत्यसंस्कार करण्याची विनंती केली. त्यानुसार आम्ही अंत्यसंस्कार केले व त्याचे व्हिडिओचित्रण अमेरिकेतील त्यांच्या मुलांना दाखवले. सर्वच अंत्यसंस्कार प्रकरणांचे चित्रण आम्ही करतो तसेच बेवारस मृतदेह असल्यास काही दिवस मृतदेह शवागारात ठेवून नातेवाईकांना शोधण्याचा प्रयत्नही करतो. काहीवेळा नातेवाईक सापडतात मात्र ते येण्यास इच्छूक नसतात. मानवी स्वभावाचे अनेक विचित्र आविष्कार आम्हाला आजपर्यंत अनुभवायला मिळाल्याचे हमराज यांनी सांगितले. या रुग्णसेवाकार्याला पूर्णवेळ वाहून घेण्यासाठी ‘पुकार सेवा प्रतिष्ठान’ नावाची संस्था स्थापन केली असून ‘एक धाव गरजूंसाठी’ हे बोधवाक्य निश्चित केले आहे. हमराज यांची पत्नी प्रीती जोशी, राजेश्री सावंत, समीर शेख, आशिष बनकर, अभिषेक सुरदुसे, भुषण सुरदुसे, महेंद्र क्षीरसागर अशी टीम या संस्थेत जमा झाली आहे. सोशल मिडीयावर संस्थेच्या कामाची माहिती देताना ‘आवाज तुमचा सेवा आमची’ अशी हाक दिली जाते. पोलिसांकडून वा कोणीही फोन करून माहिती दिली की हे पथक तात्काळ आवश्यक तो प्राथमिक औषधांचा किट घेऊन घटनास्थळी जातो व तेथील वृद्धावर पहिल्या टप्प्यात जागेवरच उपचार करतो. नंतर या वृद्धाला रुग्णालयात दाखल करून हे पथक रुग्ण बरा होईपर्यंत काळजी घेते. आगामी काळात रस्त्यावरील निराधार वृद्धांसाठी निवारा उभारायचा पुकार संस्थेचा विचार आहे. दरम्यान हमराज यांचे कार्य पाहून एका कंपनीने त्यांच्या संस्थेला २०२३ मध्ये मोबाईल रुग्णवाहिका घेऊन दिली तर २०२४ मध्ये एका कंपनीने सीएसआर निधीमधून रुग्णवाहिका दिली. या दोन्ही रुग्णवाहिकांच्या माध्यमातून साधारणपणे दरमहा चाळीच रुग्णांना रुग्णालयात दाखल केले जाते. महत्वाचा मुद्दा हा की, रस्त्यावरील वृद्ध जखमी भिकाऱ्यांवर प्रामुख्याने जागच्या जागी प्रथमोपचार करून मग त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल केले जाते. तेथेही पुकार संस्थेचे कार्यकर्ते रुग्ण बरा होईपर्यंत त्याची काळजी घेतात. पुकार संस्थेचे काम माहित असल्यामुळे अनेकदा स्थानिक पोलीसांना रस्त्यावर कोणी जखमी वृद्ध व्यक्ती दिसल्यास तेच फोन करून माहिती देतात असे हमराज जोशी यांनी सांगितले.