मोठय़ा प्रमाणावर साठेबाजी सुरू असल्याने तूर, उडीद डाळींचे दर वाढत असून ते १५० ते १८० रुपये प्रतिकिलोच्या घरात आहेत. साठय़ांवर र्निबध लागू असतानाही दर वाढत असल्याने अन्न व नागरी पुरवठा विभाग चिंताग्रस्त असून साठेबाजांवर धाडसत्र सुरू करण्याचे आदेश गेल्या आठवडय़ातच दिले आहेत. पण अजूनही शिधावाटप नियंत्रक, जिल्हाधिकारी आदींनी कोणतीही पावले टाकली नसल्याने डाळींचे दर आणखी वाढण्याची भीती आहे.
तूरडाळीचे उत्पादन चांगले असल्याने शेतकऱ्यांना कमी दर दिला जात आहे. तर दुसरीकडे मुंबई, ठाणे आदी शहरी भागांत चांगल्या दर्जाची तूरडाळ, उडीदडाळ यांचे दर प्रतिकिलो १५० ते १८० रुपयांपर्यंत आहेत. मसूर व मूगडाळही १३० ते १६० रुपये प्रतिकिलोच्या घरात आहे.
गेल्या चार महिन्यांत तूरडाळ आयात केल्यावर आणि नवीन पीक उपलब्ध झाल्यावर तूरडाळीचे दर प्रतिकिलो २०० रुपयांपेक्षा कमी झाले. पण अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी जाहीर केल्यानंतर चार-पाच महिने उलटूनही तूरडाळ १०० रुपये किलो कधी झालीच नाही. सध्या तूरडाळीसह अन्य डाळींचा मोठय़ा प्रमाणावर साठा करण्यात येत असून गुजरातमधील व्यापारीही त्यात आघाडीवर आहेत. डाळींच्या साठय़ावर राज्य सरकारने गेल्यावर्षी घातलेले र्निबध ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत लागू आहेत.
तूरडाळीसह डाळींच्या दरांबाबत ओरड झाल्यावर गेल्यावर्षी दिवाळीच्या दरम्यान आठ-दहा दिवस धाडसत्र झाले. पुढे तूरडाळ १०० रुपये प्रतिकिलो दराने विकण्याचे हमीपत्र घेऊन तो साठा सोडून देण्यात आला.
बाजारपेठेतील दरांचा अभ्यास करून पावले टाकण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने मंत्रालयात एक विशेष कक्ष सुरू केला आहे.
डाळींचे दर वाढत असल्याने आठवडय़ापूर्वीच जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून निर्देश देण्यात आले आहेत. पण मुंबई व ठाणे शिधावाटप क्षेत्रात आणि राज्यभरात जिल्हाधिकाऱ्यांनी अजून साठय़ांची तपासणी आणि साठेबाजांवर कारवाई सुरूच केलेली नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांत तूरडाळीचा दर गेल्यावर्षीप्रमाणेच २०० रुपये प्रतिकिलोपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
डाळींचे किरकोळ बाजारातील प्रतिकिलोचे दर
* तूरडाळ – १५० ते १९० रुपये
* उडीदडाळ – १६० ते १९० रुपये
* मूगडाळ – १५० ते १७० रुपये
* मसूरडाळ – १४० ते १६० रुपये