‘कफन’
बोलकं छायाचित्र तिचं,
खिशात हृदयाच्या ठेवलय मी,
हास्य मधुर तिचं …
डोळ्यात माझ्या साठवलंय मी
घायाळ करणारे इशारे तिचे,
आलोय तिथेच विसरून मी …
नाद मंजुळ पैंजणांचा तिच्या,
आलोय तिथेच हरवून मी
बोबड्या बोलाना
बाळाच्या माझ्या आलोय फसवून मी,
पत्नीच्या विरह अश्रुंना
निरोप प्रेमाचा आलोय देऊन मी
चेहऱ्यावरच्या मात्या पित्याच्या
प्रश्नांना आलोय भुलवून मी
आशीर्वादाचे पंख
गरुडझेपि आलोय लावून मी
आलोय जाळून तिथेच,
जाती धर्मांचे गाठोडे मी
आलोय तोडून शृंखला,
भाषा प्रांतवादांच्या मी
भारतमातेचा जयघोष करीत,
आहे सज्ज रक्षणासाठी तिच्या मी
रोविला आहे हृदयात माझ्या,
मुक्त फडकता झेंडा , तिरंगा मी …
ओकीत आग थकेल सूर्य,
करपलो तरी नमविन शत्रूला मी
गारठतील पर्वतरांगा हिमवर्षावाने,
गारठलो तरी उठेन पेटून मी
प्रेमापायी मायभूमीच्या,
बांधले कफन डोक्याला मी
वीर मरणाचे स्वप्न पहात,
उभा धगधगत्या सीमेवर मी
देता आलिंगन वीरमरणाला
कानी हुंदके मायभूचे हे पडती …
सोंगा ढोंगाची नको मज श्रद्धांजली,
देशप्रेम ज्योतीने पेटवारे आत्मज्योती …
– मधुकर गजाकोष (मधुकोश)