मुंबई : पश्चिम रेल्वेवरील वक्तशीरपणा सुधारण्यासाठी रेल्वे प्रशासनाने वेगमर्यादा रद्द करणे, रेल्वे मार्गाची देखभाल-दुरुस्ती करणे यासारख्या उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे भारतीय रेल्वेमध्ये पश्चिम रेल्वेच्या लांबपल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांचा वक्तशीरपणा ९५ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास निश्चित वेळेत पूर्ण होत आहे.
पश्चिम रेल्वेवरील धोक्याच्या ठिकाणी किंवा अत्यावश्यक ठिकाणी मेल, एक्स्प्रेससाठी वेग मर्यादा आखण्यात आली आहे. परंतु, या ठिकाणी पायाभूत सुविधा वाढवून, वेग मर्यादा रद्द केली आहे. तसेच समांतर रस्ता फाटक (लेव्हल क्रॉसिंग गेट) बंद करून, रेल्वेगाड्यासाठी सुरळीत वाहतूक सुरू करणे यासह इतर अडचणी दूर करून पश्चिम रेल्वेच्या रेल्वेगाड्या वेळापत्रकानुसार धावाव्यात यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पश्चिम रेल्वेचा वक्तशीरपणा वाढवून प्रवाशांच्या वेळेची बचत केली जात आहे. पश्चिम रेल्वेतील एका ठिकाणाची वेग मर्यादा हटवल्याने, साधारणपणे एक ते दीड मिनिटांची बचत होते. परिणामी, संपूर्ण दिवसातील वेळ वाचतो, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली.
पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागात गेल्या पाच वर्षात १०५ समांतर रस्ता फाटक (लेव्हल क्रॉसिंग गेट) बंद करण्यात आले आहेत. समांतर रस्ता फाटक बंद केल्याने आणि उड्डाणपूल उभारल्याने रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचा खोळंबा कमी होणार आहे. वाहनचालकांना लोकल जाण्याची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तसेच रेल्वे प्रवाशांच्या प्रवासात देखील १ ते २ मिनिटांची बचत होईल.पश्चिम रेल्वेने २०२४-२५ या वर्षात १४० उड्डाणपूल तयार केले आहेत. त्यामुळे रस्ते वाहतुकीतील अडथळे दूर झाले आहेत.
भंगार विक्रीत पश्चिम रेल्वे दुसऱ्या क्रमांकावर
‘शून्य भंगार मोहिम’चा एक भाग म्हणून पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल, वडोदरा, रतलाम, राजकोट, भावनगर आणि अहमदाबाद या विभागातील भंगार विक्रीचा उपक्रम हाती घेतला. या मोहिमेतंर्गंत प्रत्येक विभागातील, कारखान्यातील आणि कारशेडमधील भंगार साहित्य गोळा करण्यात येत आहे. याद्वारे २०२४-२५ आर्थिक वर्षात भंगार विक्रीतून पश्चिम रेल्वेला ५६४ कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाला आहे. पश्चिम रेल्वेने उत्तर रेल्वे, दक्षिण रेल्वे आणि पूर्व रेल्वेसह भंगार विक्रीसाठी ५०० कोटी रुपयांच्या क्लबमध्ये देखील सामील झाले आहे.
रेल्वे परिसरातील वापरात नसलेले छप्पर, पडीत खांब, रेल्वे रूळ, मोठ्या-मोठ्या यंत्रणाचे नादुरूस्त भाग भंगारात विकण्यात येतात. भंगार साहित्य पडून राहिल्याने अस्वच्छता होते आणि जागाही अडून राहते. त्यामुळे शून्य भंगार मोहिमेतून भंगार हटविण्यात येत आहे. लोह, स्टील, ॲल्युमिनियम, पितळ, तांबे व इतर धातूच्या भंगाराची विक्री करण्यात आली. यासह मोडीत काढलेले रेल्वेचे डबे, वाघिणी, इंजिन, जुने डबे, माल डबे, चाकांची विक्री करण्यात आली. पश्चिम रेल्वेने २१ मार्च २०२५ रोजी भंगार विक्रीत ५०० कोटींचा टप्पा ओलांडला.