मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे वर्तुळाकार रस्ता प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे काम १२ टप्प्यांत होणार असून यापूर्वी नऊ टप्प्यांतील कामासाठी निविदा अंतिम करून कंत्राट बहाल करण्यात आली. आता उर्वरित तीन टप्प्यांतील कामासाठीच्या आर्थिक निविदा सोमवारी खुल्या करण्यात आल्या. त्यानुसार दोन टप्प्यासाठी अफकाॅन इन्फ्रास्ट्रक्चरकडून तर एका टप्प्यासाठी जीआर इन्फ्राप्रोजेक्टकडून सर्वात कमी बोली लावण्यात आली आहे. त्यामुळे या दोन कंपन्यांना कंत्राट मिळण्याची शक्यता आहे. त्यानुसार लवकरच कंत्राट अंतिम केले जाणार आहे.
एमएसआरडीसी १२६ किमी लांबीच्या पुणे वर्तुळाकार रस्त्याचे काम हाती घेणार आहे. येत्या काही दिवसातच या प्रकल्पाचे भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात केली जाणार आहे. या प्रकल्पातील नऊ टप्प्यांतील कामाचे कंत्राट बहाल करून पात्र कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात आले आहेत. भूसंपादनही अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पाला आणखी वेग देण्यासाठी उर्वरित तीन टप्प्यांतील निविदा प्रक्रिया अंतिम करण्याच्या कामालाही वेग देण्यात आला आहे. १२ पैकी तीन टप्प्यांची निविदा प्रक्रिया काही कारणाने उशीराने सुरू झाली असून सोमवारी तीन टप्प्यांसाठीच्या आर्थिक निविदा खुल्या करण्यात आल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
हेही वाचा >>>पक्ष्यांवर ‘संक्रांत’… जखमी पक्ष्यांसाठी मदत क्रमांक सुरू
वलाटी, हवेली ते सोनेरी, पुरंदर या ई ५ टप्प्यासाठी अफकाॅन आणि नवयुगा इंजिनीअरिंग कंपनीकडून आर्थिक निविदा सादर करण्यात आल्या होत्या. तर सोनोरी ते गराडे, पुरंदर या ई ६ टप्प्यासाठी जीआर इन्फ्राप्रोजेक्ट, पटेल इन्फ्रास्ट्रक्चर, पीएनसी इन्फ्राटेकसह अन्य एका कंपनीने आर्थिक निविदा सादर केली आहे. त्याच वेळी गराडे, पुरंदर ते शिवरे, भोर या ई ७ टप्प्यासाठी नवयुगा अफकाॅनने निविदा सादर केल्या आहेत. त्यानुसार ई ५ आणि ७ टप्प्यासाठी सर्वात कमी बोली अफकाॅनकडून तर ई ६ टप्प्यासाठी जीआर इन्फ्राप्रोजेक्टकडून लावण्यात आली आहे. त्यामुळे अफकाॅनला दोन टप्प्याचे तर जीआर इन्फ्राप्रोजेक्टला एका टप्प्याचे काम मिळण्याची शक्यता आहे.