पुण्यात १ ऑगस्ट रोजी झालेले तीन बॉम्बस्फोट फुसके ठरले तरी त्यातील स्फोटके शक्तिशाली होती, हे राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने त्यावेळी मान्य केले होते. हे स्फोट घडविणाऱ्यांनीच दलसुखनगरची रेकी केली होती, ही बाबही आता पुढे आल्याने पुण्यातील स्फोटाच्या कटाला दहशतवाद्यांनी हैदराबादमध्ये अंतिम स्वरुप दिले का, या दिशेने दहशतवादविरोधी विभागाने तपास सुरू केला आहे. पुणे आणि हैदराबादेतील बॉम्बस्फोटांची पद्धत एकच असल्याचेही वरिष्ठ सूत्रांनी स्पष्ट केले.
पुण्यातील स्फोटामालिकेत फक्त एक जण जखमी झाला होता. मात्र त्या बॉम्बमध्ये जी स्फोटके होती ती पूर्ण क्षमतेने फुटली असती तर मोठा घातपात झाला असता, हे घटनास्थळी तपासणीसाठी गेलेल्या न्यायवैद्यकांनीही मान्य केले होते. मात्र सर्किट जुळणीत घोळ झाल्याने मोठे स्फोट टळले होते.
अर्थात पुण्यात फसलेली मोहिम अतिरेक्यांनी हैदराबादेत राबविल्याचा एटीएसमधील वरिष्ठ सूत्रांनी इन्कार केला आहे.
महाराष्ट्रात घातपाताची जबाबदारी असलेले मॉडय़ुल अन्यत्र काम करीत नाही, असेही या सूत्रांनी सांगितले. मात्र या दोन्ही पद्धती एकच असल्यामुळे यामागे इंडियन मुजाहिद्दीन असावी, हे मात्र या सूत्रांनी मान्य केले.
मृतांचा आकडा १६ वर
स्फोटातील मृतांची संख्या १६ झाली आहे. शुक्रवारी दोन जखमींचा मृत्यू झाला.
६ लाखांची भरपाई
स्फोटात कायमचे अपंगत्व आले त्यांना आंध्रप्रदेश सरकारने प्रत्येकी सहा लाख रुपये नुकसानभरपाई जाहीर केली आहे.

Story img Loader