मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) गुरुवारी पुणे आयसिस मॉडय़ूल प्रकरणातील आरोपी शामिल साकिब नाचन याच्या ठाण्यातील पडघा येथील घरावर छापा टाकला. या वेळी संशयित वस्तू जप्त करण्यात आल्या. शामिल सध्या एनआयए कोठडीत आहे. आयसिसचा सदस्य असलेल्या शामिलच्या पडघा येथील घरात झडती घेतली त्या वेळी अनेक मोबाइल संच, हार्ड डिस्क आणि काही हस्तलिखित कागदपत्रे मिळाली. त्यांची तपासणी आणि विश्लेषण केले जात असल्याचे एनआयएकडून सांगण्यात आले.
शामिल एप्रिल २०२२ पासून दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. शामिलचा दहशतवादी कृत्यांसाठी ‘इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस’ची (आयईडी) निर्मिती, प्रशिक्षण आणि चाचणीमध्ये सक्रिय सहभाग असल्याचा आरोप आहे. तो वावरत असलेल्या मोबाइलचे ठिकाण वेगवेगळय़ा वेळी पुण्यातील कोंढवा येथील असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
शामिल आणि त्याचे वडील साकिब यांच्या घरी एनआयएचे पथक गेल्या गुरुवारी गेले होते. त्यांना नोटीस देऊन चौकशीसाठी एनआयए कार्यालयात बोलवण्यात आले. दोघेही चौकशीसाठी उपस्थित राहिले होते. चौकशीनंतर साकीबला रात्री उशिरा घरी जाण्याची परवानगी देण्यात आली; पण एनआयएने शामिलला याप्रकरणी अटक केली. साकिब नाचन हाही ‘सिमी’ या प्रतिबंधित संघटनेचा पदाधिकारी होता. शामिल हा जुल्फिकार अली बडोदावाला, मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी, सिमाब नसिरुद्दीन काझी, अब्दुल कादिर पठाण आणि इतर काही संशयितांच्या मदतीने काम करीत होता. कोंढवा येथे त्यांनी ‘आयईडी’ एकत्र आणले होते. तसेच गेल्या वर्षी बॉम्ब प्रशिक्षण आणि कार्यशाळा आयोजित केली होती. शामिल त्यात सहभागी झाल्याचा आरोप आहे.