बँकॉकच्या फेऱ्या घरी कळू नयेत म्हणून एका ५१ वर्षीय पुणेकराने पासपोर्टची पानं फाडली. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा पुणेकर उतरल्यानंतर त्याच्याविरोधात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मुंबई विमानतळावर काय घडलं?
इमिग्रेशन अधिकारी राजीव रंजन कुमार यांनी पुण्यातल्या ५१ वर्षीय माणसाचा पासपोर्ट तपासला. त्यावेळी पासपोर्टची काही पानं फाडली असल्याची बाब राजीव कुमार यांना लक्षात आली. यानंतर या पुणेकरावर मुंबई विमानतळावर गुन्हा दाखल करण्यात आला. या माणसाची चौकशी झाल्यानंतर कळलं की बँकॉकच्या फेऱ्या घरी समजू नयेत म्हणून त्याने पासपोर्टची पानं फाडली. सोमवारी ही घटना उघडकीस आली आहे.
राजीव रंजन कुमार यांनी काय सांगितलं?
इमिग्रेशन अधिकारी राजीव रंजन कुमार यांनी हेदेखील सांगितलं की हा पुणेकर माणूस जेव्हा इमिग्रेशनसाठी काऊंटरवर आला तेव्हा तो इंडोनेशियाहून व्हिएतनाममार्गे आल्याचं समोर आलं. तसंच त्याच्या पासपोर्टची काही पानं फाडली गेली आहेत हे कळलं. पासपोर्ट नीट तपासल्यानंतर राजीव रंजन कुमार यांना समजलं की एक किंवा दोन नाही तर बरीच पानं या पुणेकराने फाडली आहेत. त्यानंतर या पुणेकर प्रवाशाला ताब्यात घेण्यात आलं आणि चौकशी करण्यात आली तेव्हा बँकॉकच्या फेऱ्या कुटुंबाला कळू नयेत म्हणून आपण हे केल्याचं या माणसाने सांगितलं. वर्षभरापासून आपण ही पानं फाडली आहेत हे या पुणेकर प्रवाशाने सांगितलं. या पानांवर बँकॉकला जाऊन आल्याचे सगळे तपशील होते. ते घरी कळू नयेत यासाठी आपण हे कृत्य केल्याचं त्याने सांगितलं. ज्यानंतर या प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पासपोर्ट कायद्याच्या अन्वये गुन्हा दाखल
पासपोर्ट किंवा प्रवासाशी संबंधित कागदपत्रं फाडणं हे बेकायदेशीर आहे. त्यामुळे इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी तातडीने या गोष्टीची दखल घेतली आणि सहार पोलीस ठाण्यात या पुणेकराविरोधात गुन्हा दाखल केला. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे. पासपोर्ट कायद्याच्या कलम १२ आणि कलम ३१८ (४) च्या अन्वये या पुणेकर प्रवाशावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.