रेल्वे अर्थसंकल्पामध्ये मंजूर झालेल्या सहा हायस्पीड कॉरीडॉरपैकी पुणे-मुंबई-अहमदाबाद हायस्पीड कॉरीडॉरमधून पुणे-मुंबई मार्ग वगळण्यात आला आहे. हा मार्ग आर्थिकदृष्टय़ा उपयुक्त नसून आता हा कॉरीडॉर केवळ मुंबई-अहमदाबाद असाच करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला असल्याचे समजते. हा कॉरीडॉर मुंबईत वडाळा येथे आणण्यासाठी मुख्यमंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री आग्रही असले तरी पश्चिम रेल्वेवरच हा कॉरीडॉर ठेवण्याचा प्रयत्न रेल्वे बोर्डाचा असल्याचे सांगण्यात
येते.
रेल्वे अर्थसंकल्पामध्ये पुणे-मुंबई-अहमदाबाद हायस्पीड कॉरीडॉर मंजूर करण्यात आला होता. या प्रकल्पासाठी राज्य सरकारही उत्सुक होते. हा कॉरीडॉर पुण्याहून बदलापूर-भिवंडी मार्गे पश्चिम रेल्वेवरून अहमदाबादकडे जाणारा होता. हा मार्ग पुण्याहून बंगळुरूपर्यंत वाढवावा, असा प्रयत्न मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांचा होता. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना थेट अहमदाबाद ते बंगळुरू असा प्रवास करता आला असता. त्याचप्रमाणे मुंबई उपनगरातील काही स्थानकांपर्यंत या कॉरीडॉरचा लाभ व्हावा असाही प्रयत्न मध्य रेल्वेचा होता. मात्र घाट मार्ग आहे, प्रवाशांना त्याचा विशेष लाभ मिळणार नाही, मुंबईत ही गाडी येणारच नाही, असे सांगत रेल्वे बोर्डाने पुणे-मुंबई हा मार्ग बंद केला आणि केवळ मुंबई-अहमदाबाद दरम्यान हायस्पीड कॉरीडॉर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.
हा हायस्पीड कॉरीडॉर हार्बर मार्गावरून पनवेलमार्गे वडाळ्यापर्यंत आणण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील यांचा आग्रह आहे. यामुळे नवी मुंबईतील प्रस्तावित विमानतळ तसेच जवाहरलाल नेहरू बंदर येथे जाण्यासाठी प्रवाशांना सोयीचे होणार असल्याचे आणि मुंबईत येण्यासाठीही वडाळा हे मध्यवर्ती ठिकाण ठरेल, असा दृष्टिकोन मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्याच्या आग्रहामागे आहे. मात्र अद्याप रेल्वे बोर्डाने त्याबाबत कोणताही निर्णय घेतला नसला तरी रेल्वे सूत्रांच्या म्हणण्यानुसार हा कॉरीडॉर केवळ पश्चिम रेल्वेवरच चालविण्यात रेल्वे बोर्डाला स्वारस्य आहे. फक्त हायस्पीड कॉरीडॉर हा मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस की विरार येथून सुरू होणार हे निश्चित होणे बाकी आहे.

Story img Loader