लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : पुणे – नाशिक महामार्ग चौपदरीकरणाच्या कामासाठी तोडण्यात आलेल्या ५ हजार ४८६ वृक्षांच्या बदल्यात देशी जातीची तब्बल ३९ हजार ५०० वृक्षांची लागवड करा, ही लागवड मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करा. तसेच या वृक्षांचे पुढील पाच वर्षे संगोपन संबंधित कंत्राटदाराने करावे, असे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) महामार्ग प्राधिकरणाला दिले आहेत. यामुळे पुणे – नाशिक महामार्ग हिरवागार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पुणे – नाशिक महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला २०१४ मध्ये सुरुवात झाली. त्यावेळी महामार्गाच्या कामात अडथळे ठरणारी ५ हजार ४८६ वृक्षे तोडण्यास उपविभागीय अधिकाऱ्यांनी परवानगी दिली. मात्र ही परवानगी देताना तोडलेल्या झाडांच्या दुप्पट, तिप्पट, पाचपट व दहापट झाडे लावण्याची अट घातली होती. मात्र, २०२० मध्ये महामार्गाचे काम पूर्ण झाले. त्यावेळी नाशिक, अहिल्यानगर, पुणे या जिल्ह्यांतून जाणाऱ्या या महामार्गाभोवती झाडे लावण्याच्या अटीचा भंग करण्यात आला. तसेच वन्यजीवांच्या सुरक्षिततेचाही विचार न करता भूयारीमार्ग, उड्डाणमार्ग विकसित करण्याकडे आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या उपाययोजनांकडेही दुर्लक्ष केल्याचे लक्षात आले होते.
महामार्गासाठी केलेली पर्यावरणाची हानी लक्षात घेत संगमनेर येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी २०२० मध्ये राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे याचिका दाखल केली होती. पूर्वी महसूल व वन विभाग हा वृक्षतोड करण्यास परवानगी द्यायचा. आता वन विभागाकडून परवानगी देण्यात येत असली तरी अटी शर्तींचे पालन होते की, नाही याकडे वन विभागााकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याकडेही या याचिकेत लक्ष वेधले आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीबरोबरच वन्यप्राण्यांच्या सुरक्षेबाबत दाखल केलेली अशा प्रकारची ही पहिलीच याचिका असावी.
वृक्ष लागवडीबाबत केलेल्या दुर्लक्षाबाबत न्यायधिकरणाने महामार्ग प्राधिकरणाला धारेवर धरत मार्च २०२५ पर्यंत या मार्गाच्या लगत ३९ हजार ५०० झाडे लावण्याचे आदेश दिले आहेत. नाशिकच्या सिन्नर, तसेच अहिल्यानगरच्या संगमनेर आणि पुण्याच्या जुन्नर, आंबेगाव, राजगुरूनगरमधून जाणाऱ्या महामार्गाच्या दुतर्फा देशी प्रजातीच्या झाडांची लागवड करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पाच वर्षांपर्यंत त्यांचे संगोपनदेखील करणे आवश्यक असून, त्याची जबाबदारी ठेकेदारावर सोपवण्यात आली आहे.
पुण्यात वन्य प्राण्याच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष
महामार्ग ओलांडतांना प्राण्यांना जीव गमवावा लागत असल्याने पुणे व संगमनेर येथे उड्डाणपूल व भुयारी मार्ग बांधण्याची गरज याचिकेत मांडली होती. मात्र संगमनेरमध्ये दोन उड्डाणपूल व एक भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे. मात्र पुण्यातील वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पुण्यामध्ये वन्य जीवांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याची भावना सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी व्यक्त केली.
तालुकानिहाय लावावी लागणारी झाडे
तालुका | तोडलेली झाडे | लावावी लागणारी झाडे |
खेड | २३१ | ५६२ |
आंबेगाव | ५६४ | ५५४९ |
जुन्नर | १२७३ | ६३६५ |
नारायण गाव | ६ | १८ |
संगमनेर | २३७३ | २३७३० |
सिन्नर | १०३९ | ३११७ |
एकूण | ५४८६ | ३९२४१ (३९५००) |