मुंबई : ठाणे खाडी पूल ३ प्रकल्पातील दक्षिणेकडील बाजूचे अर्थात पुणे, नवी मुंबईहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेचे काम अखेर पूर्ण झाले आहे. त्यामुळे ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला आहे. या मार्गिकेचे १ मे रोजी लोकार्पण होण्याची दाट शक्यता आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू आहे. ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्यास ठाणे खाडी पूल १ आणि २ वरील भार कमी होणार असून पुणे, नवी मुंबई – मुंबई प्रवास सुसाट होण्यास मदत होणार आहे.कामाला २०२० मध्ये सुरुवात
मुंबई आणि नवी मुंबईला रस्ते मार्गे खाडी ओलांडून जाण्यासाठी सध्या दोन ठाणे खाडी पूल कार्यान्वित आहेत. पहिला ठाणे खाडी पूल १ आणि दुसरा ठाणे खाडी पूल-२. १९७३ मध्ये ठाणे खाडी पूल – १ बांधण्यात आला असून या दोन पदरी खाडी पुलावरून केवळ हलक्या वाहनांची वाहतूक होते. याच ठाणे खाडी पुलापासून २२ मीटर अंतरावर १९९४ मध्ये ठाणे खाडी पूल-२ बांधण्यात आला. या पुलावरून अवजड वाहनांसह सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक होते.
त्यामुळे ठाणे खाडी पूल-२ वरील भार दिवसेंदिवस वाढत आहे. वाहनांची संख्या वाढत असल्याने आता या पुलाचा सेवा दर्जाही खालावला आहे. त्यामुळे या पुलांवरील भार कमी करण्यासाठी, वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एमएमआरडीएसीने एकूण १.८३७ किमी लांबीचा तीन-तीन पदरी आणि ठाणे खाडी पूल २ ला समांतर असा ठाणे खाडी पूल ३ बांधण्याचा निर्णय घेतला. ७७५.५७ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाच्या कामास २०२० मध्ये सुरुवात झाली. हा प्रकल्प याआधीच पूर्ण होऊन वाहतूक सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र करोना संकट आणि इतर तांत्रिक कारणांमुळे प्रकल्पास विलंब झाला. पण करोना संकट टळल्यानंतर एमएसआरडीसीने कामाला वेग दिला आणि ऑक्टोबर २०२४ मध्ये ठाणे खाडी पूल ३ प्रकल्पातील उत्तरेकडील बाजू अर्थात मुंबईहून नवी मुंबई, पुण्याच्या दिशेने जाणारी मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्यात आली. ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यास मदत झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
काम पूर्ण
उत्तरेकडील बाजू वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर दक्षिणेकडील बाजू अर्थात पुणे, नवी मुंबईहून मुंबईला येणारी मार्गिका केव्हा सुरू होणार याची वाहनचालक-प्रवाशांना प्रतीक्षा होती. ही प्रतीक्षा आता अखेर संपणार आहे. या मार्गिकेचे काम पूर्ण झाले असून सध्या रंगरंगोटी सुरू असल्याची माहिती एमएसआरडीसीतील सूत्रांनी दिली. ही मार्गिका मेच्या सुरुवातीला वाहतूक सेवेते दाखल होईल, असेही सूत्रांनी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे लोकार्पणासाठी १ मेचा मुहूर्त साधण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. याविषयी एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांना विचारले असता त्यांनी दक्षिणेकडील मार्गिकेचे काम पूर्ण झाले असून लवकरच ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करू असे सांगितले. मात्र यासाठी कोणतीही तारीख अद्याप निश्चित नसल्याचेही ते म्हणाले. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ – आरे मेट्रो ३’ मार्गिकेतील बीकेसी – आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक, नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गातील इगतपुरी – आमणे टप्पा आणि ठाणे खाडी पूल ३ प्रकल्पातील दक्षिणेकडील मार्गिका अशा तिन्ही प्रकल्पांचे लोकार्पण एकाच दिवशी करण्याचे नियोजन राज्य सरकारच्या स्तरावर सुरू आहे. मात्र याबाबत उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. मात्र संबंधित यंत्रणा प्रकल्पांच्या लोकार्पणाच्या दृष्टीने आवश्यक ती तयारी करीत आहेत. त्यामुळे आता या तिन्ही प्रकल्पांच्या लोकार्पणाच्या तारखेच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा मुंबईकरांना आहे.