लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : पुणे-शिरुर अंतर दोन ते अडीच तासांऐवजी केवळ ४५ मिनिटांत पार करता यावे यासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाने (एमएसआयडीसी) पुणे – छत्रपती संभाजी नगर शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग प्रकल्प आणि सध्याच्या पुणे – छत्रपती संभाजी नगर महामार्ग सुधारणा प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्प्यात पुणे – शिरुर उन्नत रस्त्याचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी निविदा प्रक्रिया सध्या सुरू असून दीड – दोन महिन्यांत निविदा प्रक्रिया अंतिम करून आठ महिन्यात कामास सुरुवात करण्यात येणार आहे.
पुढील चार वर्षांत काम पूर्ण करून अंदाजे २०३० मध्ये हा रस्ता वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएसआयडीसीचे नियोजन आहे. हा रस्ता वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर पुणे – शिरूर अंतर ४५ मिनिटांत पार करता येणार आहे. या अतिजलद प्रवासासाठी पथकर मोजावा लागणार आहे. आता या प्रकल्पासाठी केंद्रीय भूपृष्ठ व महामार्ग मंत्रालय २००८ पथकर धोरण लागू करण्याचा निर्णय नुकताच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
प्रकल्पासाठी ७५१५ कोटी रुपये खर्च अपेक्षित
पुणे – छत्रपती संभाजी नगर प्रवास अतिजलद करण्यासाठी पुणे – छत्रपती संभाजी नगर शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग बांधण्यासह सध्याच्या पुणे – छत्रपती संभाजी नगर महामार्ग सुधारणा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतला होता. मात्र गेल्या वर्षी हा प्रकल्प एमएसआयडीसीकडे देण्यात आला आहे. त्यानुसार शीघ्रसंचार महामार्गाच्या पहिल्या टप्प्यात ५४ किमी लांबीचा पुणे – शिरुर उन्नत रस्ता, तर सध्याच्या महामार्गात ५४ किमी लांबीचा पुणे – शिरुर उन्नत रस्ता बांधण्यात येणार आहे. या रस्त्यांच्या बांधकामासाठी एमएसआयडीसीकडून काही महिन्यांपूर्वी निविदा मागविण्यात आल्या आहेत. सहा मार्गिकेच्या आणि ७५१५ कोटी रुपये खर्चाच्या या कामासाठीच्या निविदा १ एप्रिलला खुल्या करण्यात येणार होत्या. मात्र आता या निविदेस १५ दिवसांची मुदत देण्यात येणार असल्याची माहिती एमएसआयडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
‘बांधा – वापरा – हस्तांतरित करा’ तत्वाचा वापर
हा प्रकल्प बांधा-वापरा-हस्तांतरीत करा तत्वावर राबविण्यात येत असून या प्रकल्पाचा खर्च वसूल करण्यासाठी या महामार्गावर पथकर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या रस्त्यासाठी राज्य सरकारचे पथकर धोरण लागू होत असल्याने भविष्यात हलक्या वाहनांसह अन्य काही वाहनांना पथकर लागू होणार नव्हता. त्यामुळे एमएसआयडीसीने पुणे – छत्रपती संभाजी नगर शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाला केंद्रीय भूपृष्ठ व महामार्ग मंत्रालय २००८ पथकर धोरण लागू करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानुसार नुकताच हा प्रस्ताव मान्य करून या महामार्गाला केंद्राचे पथकर धोरण लागू करण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता पुणे – शिरुर उन्नत रस्ता आणि शिरुर – छत्रपती संभाजी नगर शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग खुला झाल्यास सर्व प्रकारच्या वाहनांना पथकर मोजवा लागणार आहे.
महिन्याभरात निविदा खुल्या करण्याचे नियोजन
उन्नत रस्ता प्रकल्पाच्या निविदेत आता बदल करून १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात येणार आहे. येत्या महिन्याभरात निविदा खुल्या करून त्या अंतिम करण्याचे एमएसआयडीसीचे नियोजन आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही करून प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यासाठी किमान आठ महिन्यांचा कालावधी लागेल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. काम सुरू झाल्यापासून ते पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारास चार वर्षांची मुदत देण्यात येणार आहे. त्यामुळे हा उन्नत रस्ता २०३० पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
नवीन महामार्गासह सध्या महामार्गावरील उन्नत रस्ते वाहतूक सेवेत दाखल झाल्यास पुणे – शिरुर प्रवास अतिजलद होणार आहे. मात्र त्यासाठी पथकर मोजावा लागणार आहे. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यात शिरुर – छत्रपती संभाजी नगर दरम्यानच्या २०० किमी लांबीच्या शीघ्रसंचार महामार्गाचे काम हाती घेण्यात येणार आहे. मात्र दुसरा टप्पा सध्या कागदावरच असून त्यासाठी नियोजन सुरू असून दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू होण्यास वेळ लागणार आहे.