बलात्कारासारख्या प्रकरणात कायदा कठोरच असला पाहिजे, असे स्पष्ट करीत १६ वर्षांच्या शाळकरी मुलीचे अपहरण करून तिची लैंगिक छळवणूक करणे आणि नंतर तिला वेश्याव्यवसायात ढकलल्याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने २० जणांना सुनावलेल्या शिक्षेवर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. मात्र मुख्य आरोपीसह काही आरोपींचे तरुण वय लक्षात घेऊन न्यायालयाने काहीजणांची शिक्षा कमी केली.
न्यायमूर्ती यू. डी. साळवी आणि न्यायमूर्ती ए. आर. जोशी यांच्या खंडपीठाने ही शिक्षा कायम केली. त्या वेळी निकालात त्यांनी बलात्कारासारख्या गुन्ह्यांत कायदा कठोरच असण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे. केवळ या गुन्ह्यांमध्ये महिलेला शारीरिक दुखापतच केली जाते म्हणून नाही, तर आयुष्यभरासाठी तिला मानसिकदृष्टय़ा इजा केली जात असल्याने ते गरजेचे असल्याचे खंडपीठाने नमूद केले आहे. संबंधित मुलगी ही वेश्याच आहे असा आपला समज होता आणि तिच्या वयाबाबत आपण अज्ञान होतो, हा आरोपींचा दावा फेटाळून लावत न्यायालयाने काहीजणांना दहा वर्षांची शिक्षा सुनावली, तर काहीजणांना त्यांच्या तरुण वयामुळे आठ वर्षांच्या कारावासाची शिक्षा दिली. प्रकरणातील मुख्य आरोपी चेतन बलगट हा संबंधित मुलीचा शेजारी होता. त्याने तिच्याशी आधी मैत्री केली. नंतर मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाल्यावर तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. त्याच्या चित्रीकरणाच्या आधारे त्याने तिला वेश्या व्यवसायात ढकलले. मे २०११ मध्ये औरंगाबाद कनिष्ठ न्यायालयाने त्याला दोषी ठरविल्यानंतर त्याने तिच्याशी लग्न केले. तसेच आपण लग्नाच्या वेळेस तिला २१ लाख रुपये, १३ लाख रुपयांचे घर दिल्याचे तसेच अहमदनगर येथे एक दुकान आणि जागाही दिल्याचा दावा करीत शिक्षा कमी करण्याची विनंती केली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा