मुंबई : करोनाकाळात महापालिकेने केलेल्या रेमडेसिवीर खरेदी प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने पुण्यशाली उर्फ पुण्य पारेख यांची बुधवारी सात तास चौकशी केली. पारेख हे ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निटवर्तीय मानले जातात. रेमडिसिविर कंत्राटाबाबत माहिती घेण्यासाठी पारेख यांची चौकशी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
पारेख यांना बुधवारी आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावून चौकशीला बोलावले होते. त्यानुसार दुपारी १२ च्या सुमारास ते आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात दाखल झाले. चौकशीनंतर सायंकाळी सातच्या सुमारास ते आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयातून बाहेर पडले. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने एका महापालिका अधिकाऱ्याचा जबाब नोंदवला होता. जबाबात रेमडेसिविर कंत्राटाबाबत पारेख यांच्या सहभागाची माहिती दिली होती. त्याबाबत पडताळणी करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने पारेख यांना आर्थिक गुन्हे शाखेने बोलावले होते. तसेच रेमडेसिविर खरेदीसंबंधी आयोजित एका बैठकीत पारेख उपस्थित होते. कोणत्या कारणामुळे ते बैठकीस उपस्थित होते हे जाणून घेण्यासाठी त्यांना आज बोलावण्यात आले होते.
मध्यवर्ती खरेदी विभागातील तत्कालीन अधिकारी, मायलान लॅबोटरीचे संचालक व इतर यांच्याविरोधात भादंवि कलम ४०६ (फौजदारी विश्वासघात), ४२० (फसवणूक), १२० (कट रचणे) व ३४ (सामायिक गुन्हेगारी कृत्य) कलमांतर्गत आग्रीपाडा पोलीस ठाण्यात ऑक्टोबरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा पुढील तपास करीत आहे. प्राथमिक चौकशीत करोना काळात रेमडेसिविर ६५० रुपये प्रति वायल दर होता. पण महापालिकेच्या मध्यवर्ती खरेदी विभागाने १५६८ रुपये प्रति वायल्स दराने रेमडेसिविरची खरेती केली. या काळात महापालिकेने ६५ हजार रेमडिसिविर इंजेक्शन चढ्या भावाने खरेदी केल्याचा आरोप आहे. त्यामुळे महापालिकेचे पाच कोटी ९६ लाख ७० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या विक्रीकर कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन उनावणे याप्रकरणातील तक्रारदार आहेत.