लोकसत्त प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या महिला बचत गटांनी तयार केलेली पुरणपोळी मुंबईकरांना ‘ऑनलाइन’ उपलब्ध होणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महानगरपालिकेने ५० बचत गटांना एकत्र आणून ‘पुरणपोळी महोत्सव’सुरू केला आहे. पुरणपोळीची मागणी https://shgeshop.com या संकेतस्थळावर नोंदवता येणार आहे. यासाठीची नोंदणी सुरू झाली असून मुंबईकरांना २८ मार्चपर्यंत पुरणपोळीसाठी मागणी नोंदवता येणार आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी ३० मार्च रोजी पुरणपोळी घरपोच मिळणार आहे.
गुढीपाडवा आणि पुरणपोळी यांचे समीकरण आहे. या दिवशी घरोघरी बनवला जाणारा हा पदार्थ वेळखाऊ व खर्चिक असल्यामुळे अनेकदा तयार पदार्थ मागवण्याकडे मुंबईकरांचा कल असतो. मात्र उत्तम पुरणपोळीची हमी मिळत नाही. मात्र मुंबई महानगरपालिकेने बचत गटांची पुरणपोळी मुंबईकरांना उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे. मुंबई महापालिकेने रोजगाराच्या शोधात असणाऱ्या आणि पाककलेत निष्णात असलेल्या महिलांना एकत्र आणून महिला बचत गट निर्माण केले आहेत. हे बचत गट कपडे, विविध पर्स, कापडी पिशव्या, आभूषणे, घरगुती वापराच्या वस्तू तयार करतात.
या बचत गटांनी पारंपरिक व्यवसायाच्या कक्षा रुंदावत ऑनलाइन पटलावरही ठसा उमटविला आहे. काही दिवसांपूर्वीच महिला बचत गटाच्या सदस्यांना ‘झोमॅटो’सोबत करार करून खाद्यपदार्थ वितरणाचा रोजगारही मुंबई महानगरपालिकेने उपलब्ध करून दिला आहे. आता यंदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महानगरपालिकेने ५० बचत गटांना एकत्र आणून ‘पुरणपोळी महोत्सवा’चे आयोजन केले आहे.
हे सर्व ५० महिला बचत गट ऑनलाइन प्रणालीचा वापर करून मुंबईकरांना पुरणपोळी थेट घरपोच पाठवणार आहेत. एसएचजी ई शॉप (shgeshop) या ऑनलाइन संकेतस्थळ प्रणालीद्वारे खवय्यांसाठी घरपोच पुरणपोळी पुरविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठीची नोंदणी सुरू झाली आहे, अशी माहिती संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर यांनी दिली.
चार किमी परिसरातील बचतगटाकडे नोंदणी
https://shgeshop.com या संकेतस्थळावर मागणी नोंदविल्यानंतर आपल्या नजीकच्या चार किलोमीटर परिसरातील महिला बचत गटाकडे याची नोंद होणार आहे. त्यानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण निवडलेल्या वेळेनुसार पुरणपोळी पोचवली जाणार आहे.
अशी नोंदवा मागणी
पुरणपोळी महोत्सवात पुरणपोळीची मागणी https://shgeshop.com या संकेतस्थळावर नोंदवता येणार आहे. यासाठीची नोंदणी सुरू झाली आहे. २८ मार्चपर्यंत मुंबईकरांनी मागणी नोंदवता येणार आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी या पुरणपोळींचे घरपोच वितरण करण्यात येणार आहे. एक सदस्य एक मागणी नोंदवताना साधारणपणे कमीत कमी तीन आणि जास्तीत जास्त दहा पुरणपोळींची मागणी नोंदवू शकतात.