शिवशाहीर बाबासाहेब पुरदंरे यांनी आपल्याला ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कारा’द्वारे मिळालेली २५ लाख रुपयांची रक्कम दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासाठी देणगी म्हणून गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याकडे सुपूर्द केली. राज्य सरकारने दिलेल्या या पुरस्काराची रक्कम दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला देणगी स्वरुपात देणार असल्याची घोषणा पुरंदरे यांनी पुरस्कार सोहळ्यातच केली होती. लता मंगेशकर यांच्या ‘प्रभुकुंज’ या निवासस्थानी जावून एका अनौपचारिक सोहळ्यात बाबासाहेबांनी २५ लाखांचा धनादेश लतादीदींकडे सुपूर्द केला.
लता दीदींच्या या रुग्णालयासाठी काही तरी मदत करावी अशी इच्छा होती. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या सामाजिक कार्यात आपलाही हातभार लागावा, या उद्देशाने आपल्याला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराच्या रुपाने मिळालेली २५ लाख रुपयांची रक्कम रुग्णालयाला देत असल्याचे बाबासाहेबांनी यावेळी सांगितले. दीदींकडून अशीच रुग्णसेवा सातत्याने व्हावी, तसेच हे रुग्णालय फक्त पुण्यातच नव्हे तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात उभे रहावे, अशी शुभेच्छाही त्यांनी दिली. यावेळी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, उषा मंगेशकर, डॉ. धनंजय केळकर आदी उपस्थित होते.