मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात नव्या बांधणीची निमआराम श्रेणीतील ‘हिरकणी’ बस मुंबई-पुणेकरांच्या पसंतीस पडली आहे. नव्या हिरकणीचा रंग हा हिरवा, पांढरा आणि त्यावर भगव्या रंगाची छटा आहे. मात्र, यात बदल करून आता जांभळय़ा आणि पांढऱ्या रंगाची रंगसंगती ‘हिरकणी’ला देण्यात येणार असून लवकरच नवी ‘हिरकणी’ एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एसटी महामंडळाच्या पुण्यातील दापोडी येथील मध्यवर्ती कार्यशाळेत नवी ‘हिरकणी’ बस आकाराला येत आहे. भविष्यात अशा २०० नव्या बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. मात्र, सध्याची रंगसंगती बदलून तिला पांढरा आणि जांभळा रंग देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार भविष्यात पाढऱ्या-हिरव्याऐवजी पांढऱ्या-जांभळय़ा रंगसंगतीत ‘हिरकणी’ दिसणार आहे.

आताच्या नव्या ‘हिरकणी’ला दिलेली रंगसंगती विजेवर धावणाऱ्या ‘शिवाई’ बसला देणार असल्याचे समजते. जांभळा रंग उन्हात फिकट होत असल्याने २०१५ साली ‘हिरकणी’ पुन्हा हिरवा – पांढरा आणि त्यावर निळा पट्टा अशा रूपात सेवेत दाखल झाली होती. तर, पांढरा आणि जांभळा रंगातील ‘हिरकणी’ आकर्षक वाटणार नाही, असे मत ‘बस फॉर अस फाऊंडेशन’चे अध्यक्ष रोहित धेंडे यांनी व्यक्त केले.

पहिल्या बसमध्ये अनेक त्रुटी..

मुंबई-पुण्यादरम्यान धावणाऱ्या ‘हिरकणी’ बसमध्ये अनेक त्रुटी असून यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. पूर्वीच्या ‘हिरकणी’मध्ये स्वतंत्र चालक केबिन होते. मात्र, नव्या बसमध्ये त्याचा अभाव आहे, तसेच या बसच्या ‘ए-पिलर’ मोठा ठेवल्याने आणि तिथे पारदर्शक काच न लावल्याने चालकाला डावीकडील रस्ता किंवा वाहने व्यवस्थित दिसत नाहीत.

‘हिरकणी’च्या रंगसंगतीत बदल करण्यात येणार आहे. पूर्वीच्या रंगसंगतीप्रमाणे ‘हिरकणी’ला जांभळा आणि पांढरा रंग देण्याचे नियोजन सुरू आहे. नव्या ‘हिरकणी’मध्ये केबिन पार्टिशियनची रचना करता येईल का याचा अभ्यास सुरू आहे. या बसमधील छोटय़ा-मोठय़ा त्रुटीत सुधारणा केली जात आहे. – शेखर चन्ने, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Purple and white buses in the hirakni bus fleet mumbai amy