मुंबई : मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवरील रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्याचे आणि शक्य तितक्या लवकर उपनगरीय रेल्वे मार्गाची क्षमता वाढवण्याच्या सूचना केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी आज दिल्या. चर्चगेट येथील पश्चिम रेल्वे मुख्यालयात शुक्रवारी मध्य रेल्वे पश्चिम रेल्वे, कोकण रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आश्विनी वैष्णव यांची बैठक पार पडली. यावेळी सिग्नलिंग सिस्टीम, कवच आणि सीबीटीसी (कम्युनिकेशन-आधारित ट्रेन कंट्रोल सिस्टीम) आदी योजनांचा आढावा घेण्यात आला.
हेही वाचा – सरकारी अधिकाऱ्यांच्या दुटप्पी वृत्तीमुळेच बेकायदा बांधकामे – उच्च न्यायालय
मध्य रेल्वेवरील परळ, कल्याण, एलटीटी आणि पनवेल कळंबोली येथे नियोजित मेगा कोचिंग टर्मिनल्सद्वारे क्षमता वाढवणे, पश्चिम रेल्वेवरील पाचवी आणि सहावी मार्गिका, विरार-डहाणू चौपदरीकरण, हार्बर मार्गाच्या विस्ताराबाबतच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. प्रवासी सुविधा वाढवण्याच्या उद्देशाने प्रकल्पांसह विविध स्थानकांवर आणि इतर महत्त्वाच्या स्थानकांवर पायाभूत सुविधांच्या विकासावर चर्चा करण्यात आली. एमयूटीपी तीन आणि एमयूटीपी तीन ए यासारख्या प्रकल्पांच्या प्रगतीची माहिती त्यांनी जाणून घेतली. तसेच लिफ्ट, सरकते जिने, उड्डाणपूल उभारण्यासह सर्व स्थानकांवर महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात यावी, मुंबईच्या रेल्वे पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी सुरू असलेल्या कामांना वेग द्यावा, भविष्यातील अतिरिक्त वातानुकूलित लोकल वाढवण्यावर विशेष लक्ष देण्याच्या सूचना अश्विनी वैष्णव यांनी केल्या.