कतार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील बाद फेरीच्या सामन्यांना शनिवारी सायंकाळी सुरुवात झाली. पण या स्पर्धेच्या गटसाखळी टप्प्यात जितक्या धक्कादायक निकालांची नोंद झाली, तितकी ती आधीच्या सगळय़ा स्पर्धामध्ये मिळूनही झालेली नाही. ही मालिका संपणार नाही, अशीच कामगिरी दुबळय़ा म्हणवणाऱ्या संघांनी करून दाखवली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जपानच्या संघाची मजल सर्वाधिक नजरेत भरणारी ठरली. जर्मनी आणि स्पेन या माजी विजेत्या संघांना एकाच गटात हरवून दाखवणारा जपान हा पहिला आशियाई संघ ठरला. विशेष म्हणजे हे दोन्ही सामने जपानने पिछाडी भरून काढत जिंकले. स्पेनविरुद्धच्या सामन्यात जपानकडे चेंडूचा ताबा २० टक्केही नव्हता. जर्मनीच्या सामन्यात जपानकडे जेमतेम ३० टक्के काळ चेंडूचे नियंत्रण होते. तरीही त्यांनी हे सामने जिंकले आणि गटात अव्वल स्थानही पटकावले. दक्षिण कोरियाने बाद फेरीत प्रवेश करताना पोर्तुगालसारख्या बलाढय़ संघाचा पराभव केला, तर उरुग्वेसारख्या जुन्याजाणत्या संघाला रोखले. आशियाई फुटबॉल संघटनेचा आणखी एक सदस्य ऑस्ट्रेलियाने मोक्याच्या सामन्यात डेन्मार्कसारख्या संघाला पराभूत केले.

बाद फेरीत जाऊ न शकलेल्या सौदी अरेबिया आणि इराणच्या संघांची कामगिरीही दुर्लक्षिण्यासारखी नाही. सौदी अरेबियाने अर्जेटिनावर मिळवलेला विजय स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धक्कादायक मानला जातो. तर इराणने वेल्सवर मिळवलेल्या २-० असा विजयही तितकाच उल्लेखनीय.
अरब जगतातला हा पहिलाच विश्वचषक आणि यानिमित्ताने मोरोक्को या अरब देशाच्या कामगिरीचीही दखल घ्यावीच लागेल. बेल्जियम आणि क्रोएशिया या संघांचा समावेश असलेल्या गटात मोरोक्कोचे अव्वल ठरणे एक अकल्पित होते. या संघाने बेल्जियमवर मिळवलेला २-० असा विजय पुढील कित्येक वर्षे चर्चिला जाईल.

आशियाई संघ आणि मोरोक्कोच्या मुसंडीमुळे जर्मनी, उरुग्वे, मेक्सिको, बेल्जियम, डेन्मार्क असे बडे संघ गटसाखळीतच गारद झाले. इतक्या मोठय़ा संख्येने बडय़ा संघांचे सुरुवातीला गरद होणे या स्पर्धेची खुमारी वृद्धिंगत करणारेच ठरले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Qatar world cup football tournamen matches qatar fifa world cup 2022 amy