मुंबई : नवीन, महारेरा नोंदणीकृत गृहप्रकल्पांना आता १ ऑगस्टपासून प्रकल्पाच्या जाहिरातीत क्युआर कोड ठळकपणे नमुद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. महारेरा क्रमांक आणि संकेतस्थळाच्या माहितीच्या बाजूलाच क्यूआर कोड ठळकपणे दाखवणे अत्यावश्यक असणार आहे. ग्राहकांना प्रकल्पाची संपूर्ण माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी या उद्देशाने महारेराने हा निर्णय घेतला आहे. १ ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी आणि ग्राहकांना घरखरेदी करणे सोपे व्हावे यासाठी महारेराकडून विविध निर्णय घेण्यात येतात. त्यानुसार आता प्रकल्पाच्या जाहिरातीत महारेरा नोंदणी क्रमांकासह प्रकल्पाचा क्युआर कोड ठळकपणे नमुद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मार्च अखेरपासून महारेराकडे नव्याने नोंदणी करणाऱ्या सर्व गृहनिर्माण प्रकल्पांना नोंदणी पत्रासह प्रकल्पांचा समग्र तपशील असलेले क्यूआर कोड द्यायला महारेराने सुरुवात केली आहे. नोंदणीकृत जुन्या प्रकल्पांनाही महारेराने क्यूआर कोड उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे आता १ ऑगस्टपासून प्रकल्पाच्या सर्व प्रकारच्या जाहिरातीत महारेरा क्रमांकासह क्युआर कोड नमुद करणे बंधनकारक आहे. अगदी समाजमाध्यमावरील जाहिरातीतही क्यु आर कोड असणे बंधनकारक आहे.
प्रकल्पाचे नाव, विकासकाचे नाव, प्रकल्प कधी पूर्ण होणे अपेक्षित आहे, प्रकल्प कधी नोंदवला गेला, प्रकल्पाविरुद्ध काही तक्रारी आहेत का, प्रकल्पाच्या विविध मंजुऱ्या, प्रकल्प सुरू झाल्यानंतर प्रकल्पाच्या मंजूर आराखडय़ात काही बदल केला का, प्रकल्पाच्या नोंदणीचे नूतनीकरण केले का, असा सर्व तपशील या क्यूआर कोडमुळे एका क्लिकवर ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ग्राहकाला घरखरेदीबाबतचा निर्णय घेणे सोपे होणार आहे. रेरा कायद्यातील तरतुदीनुसार विकासकांना दर ३ महिन्याला आणि ६ महिन्याला विविध प्रपत्रांमध्ये त्यांच्या संकेतस्थळावर माहिती अद्ययावत करावी लागते. त्यातील प्रपत्र ५ अत्यंत महत्त्वाचे आहे. हे दरवर्षी प्रकल्पाच्या संकेतस्थळावर टाकणे बंधनकारक आहे. त्यात या प्रकल्पाची सद्यस्थिती आणि एकूण खर्च आणि बाकीचे तपशील उपलब्ध होतात. हे सर्व क्यूआर कोडमुळे येथून पुढे घर बसल्या सहजपणे पाहता येणार आहेत.