मुंबई : मंत्रालयात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची चेहरा पडताळणी उपस्थिती (एफआरएस) प्रक्रिया सुरू असताना सातव्या मजल्यावरून आंदोलनकर्त्याने उडी मारल्याच्या घटनेने तेथील सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. मंत्रालयाच्या मुख्य इमारतीतील सहाव्या मजल्यापर्यंत सुरक्षा जाळी लावणाऱ्या बांधकाम विभागाने सातव्या मजल्यावर कोणत्याही प्रकारची सुरक्षा जाळी लावलेली नाही. त्यामुळेच हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.
मंत्रालयातील सुरक्षा यंत्रणा दोन टप्प्यात विकसित केली जात आहे. त्यासाठी २६ उपाययोजनांची एक नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यातील काही उपाययोजना पहिल्या टप्प्यात कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात एफआरएस यंत्रणा बसवण्याचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर सुरक्षा जाळी बसवली आहे. डिसेंबरमध्ये महायुती २ सरकार सत्तेवर आल्यानंतर सहाव्या मजल्यावरील कार्यालये सातव्या मजल्यावर स्थलांतरित केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना असलेले जनसंपर्क कार्यालय सातव्या मजल्यावर हलवले आहे. मुख्यमंत्री वैद्याकीय सहाय्यता निधी विभागात मदत मागणाऱ्यांची संख्या जास्त असते. सातव्या मजल्यानंतर संपूर्ण झाकलेले इमारतीचे छत असल्याने या मजल्यावर जाळीचे कुंपण नाही.
दोरखंडाचा अभाव
● महसूल विभागात अनेक चकरा मारल्यानंतरही दखल घेतली जात नसल्याने आंदोलक विजय साष्टे यांनी सातवा मजला गाठला आणि उडी मारली. दुसऱ्या मजल्यावर त्रिमूर्ती पटांगणाला व्यापणारी जाळी असल्याने साष्टे यांचा जीव वाचला.
●यापूर्वी या जाळीवर मारण्यात आलेल्या उड्या या स्टंटबाजीसाठी जाळीजवळच्या तीन ते चार मजल्यावरून मारण्यात आलेल्या आहेत. या आंदोलकांना बाहेर काढताना पोलिसांच्या नाकीनऊ येते. त्यांच्या सुरक्षेसाठी कोणताही दोरखंड, आधार उपाययोजना नाही. अग्निशमन दलाच्या जवानांना करावे लागणारे काम पोलिसांना करावे लागते.